बीड : गुरू व शनी ग्रहाची युती ही ४०० वर्षांनंतर घडून येणाऱ्या अवकाशीय घटनेचा बीडमधील खगोलप्रेमींनी स्कारवॉचद्वारे अनुभव घेत आनंद लुटला. गुरू व शनी ग्रहांचा सूर्याभोवती परिभ्रमण कालवधी वेग वेगळा असतो. २१ डिसेंबर २०२० रोजी गुरू व शनी एकाच कक्षेत गुरूमध्ये शनी ग्रह विलीन होतो, असा भास होतो. जो प्रत्यक्ष बीडमध्ये विद्यार्थी, प्राध्यापक, खगोलप्रेमींनी अनुभवला.
प्रत्यक्ष गुरू व शनी ग्रहात २१ डिसेंबर रोजी ४०० मिलियन मैल अंतर होते. २१ व २२ डिसेंबर रोजी येथील स्वा. सावरकर महाविद्यालयातील भूगोल विभाग आणि खगोलीय घटनांचे निरीक्षक व अभ्यासक विकास मिटकर यांनी अनुकमे स्वा. सावरकर महाविद्यालयात २१ डिसेंबर रोजी, तर विकास मिटकर यांनी त्यांच्या सावता माळी चौक येथील निवासस्थानी दुर्बिणीद्वारे गुरू व शनी ग्रहांच्या युतीचे खगोलीय दर्शन पाहण्याचे खुले आयोजन केले होते.
दुर्बिणीद्वारे प्राचार्य डॉ. संजय शिरोडकर, प्रा. अशोक डोके, प्रा. डॉ. राजेश ढेरे, प्रा. गव्हाणे, प्रा. सुरवसे, प्रा. साळवे, प्रा. धोंड, प्रा. मालपाणी, प्रा. बारटक्के, प्रा. नाईकनवरे आदींसह शहरातील खगोलप्रेमी, अभ्यासक व लहान मुलांनी गुरू, शनी व चंद ग्रहाचे दुर्बिणीद्वारे अवकाश दर्शन केले.
डबल प्लॅनेट
शनी व गुरू ग्रहाचे ग्रेट कनेक्शन (डबल प्लॅनेट) बीडकरांनी दुर्बिणीतून पाहिले. २५ डिसेंबरपर्यंत अवकाशात सूर्यास्तानंतर दक्षिण-पश्चिम दिशेला चंद्राच्या जवळ या दोन्ही ग्रहांची स्थिती किमान दोन तास आपल्याला उघड्या डोळ्यांनी पाहता येईल, असे सावरकर महाविद्यालयातील भूगोल विभागाचे प्रा. जोगेंद्र गायकवाड यांनी सांगितले.