बीड : कोरोना वॉर्डमध्ये १५ दिवस कर्तव्य बजावलेल्या डॉक्टर, परिचारीकांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. गुरूवारी जिल्ह्यातून तब्बल ४७ स्वॅब प्रयोगशाळेत पाठविले आहेत. आता या अहवालांची प्रतिक्षा बीडकरांना आहे. योद्धांचे स्वॅब असल्याने सर्वांची धाकधूक वाढली आहे.
कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर, परिचारीका, कक्षसेवकांच्या ड्यूट्या लावलेल्या आहेत. १५ दिवस कर्तव्य बजावल्यानंतर त्यांना ७ ते १४ दिवस क्वारंटाईन केले जाते. गत आठवड्यात कर्तव्य बजावलेल्या डॉक्टर, परिचारीका व कर्मचारी अशा आठ जणांसह जिल्ह्यातून ४७ स्वॅब घेण्यात आलेले आहेत. त्याचा अहवाल रात्री उशिरापर्यंत येईल, अशी शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे. कोरोना लढ्यात सहभागी असलेल्या योद्धांचे स्वॅब असल्याने सर्वांची धाकधूक वाढली असून स्वॅब निगेटिव्ह यावेत, यासाठी प्रार्थना केली जात आहे.
दरम्यान, जिल्ह्यात सध्या एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६५ एवढी आहे. पैकी एकाचा मृत्यू झाला असून ४३ कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. उद्या आणखी आठ जणांना रुग्णालयातून घरी पाठविले जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा आकडा वाढत असल्याने आणि नवीन रुग्ण कमी आढळत असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.