बीड : बीड पालिकेकडून मान्सूनपूर्व कामे केवळ कागदावरच झाली. पालिकेचा हा गलथान कारभार मंगळवारी सायंकाळी अर्धा तास झालेल्या पावसाने चव्हाट्यावर आणला. स्वच्छता व नाल्यांची सफाई न झाल्याने पाणी रस्त्यावर येऊन ठिकठिकाणी डोह साचले. यातून मार्ग काढताना बीडकरांना कसरत करावी लागली तर पावसामुळे अनेकांची धावपळ झाली.
बीड शहरात मागील काही दिवसांपासून मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर यांच्यापासून ते शिपायापर्यंत सर्वच जण पहाटेपासून ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यासंदर्भात नागरिकांना आवाहन करीत आहेत. असे असतानाही बीडमधील परिस्थिती बदलली नसल्याचे मंगळवारी दिसून आले. नागरिकांकडूनही कचरा कुंडीत किंवा घंटागाडीत न टाकता रस्त्यावर, नालीमध्ये अस्ताव्यस्त टाकला जातो. याचा परिणाम पाऊस पडल्यानंतर दिसून येतो. त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो.
दरम्यान, पाऊस येण्यापूर्वी पालिकेकडून नाल्यांची सफाई, स्वच्छता करणे अशी विविध मान्सूनपूर्व कामे केली जातात. यावर्षीही ही कामे झाल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला होता, परंतु पालिकेचा हा दावा मंगळवारी सायंकाळी अर्धा तास झालेल्या पावसाने फोल ठरवला. नाल्यांची सफाई न झाल्याने घाण पाणी रस्त्यावर आले. अनेक ठिकाणी गुडघ्याएवढे पाणी साचल्याने मार्ग काढणे जिकरीचे ठरत होते. या सर्व प्रकारामुळे पालिकेच्या गलथान कारभाराबद्दल बीडकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.बीड बसस्थानकाला तलावाचे स्वरूपबसस्थानकाच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यालगत असणाºया मोठ्या नाल्यात पाईप पडलेला आहे. नालीतील पाणी आडून बसस्थानकात आले. त्यामुळे बसस्थानकाला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते.बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांना गुडघाभर पाण्यातून जाण्याची वेळ आली. तसेच रापमंच्या बांधकाम विभागानेही बीड बसस्थानकाकडे दुर्लक्ष केल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पालिका व रापमंच्या बांधकाम विभागाविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे.