बीड : बीडचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांची चंद्रपुर येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी बारामती येथून संदीप पखाले येणार आहेत. रविवारी गृह विभागाने हे आदेश काढले आहेत.
वैभव कलुबर्मे हे तीन वर्षांपूर्वी बीडला रूजू झाले होते. त्यांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच सामाजिक उपक्रम हाती घेऊन सलोखा राखण्यात आला. तसेच गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात त्यांना यश आले होते. ठाणे प्रमुंखांशी मैत्रिपूर्ण नाते ठेवून त्यांच्याकडून चांगले काम करून घेण्याचे कौशल्य त्यांच्यात होते. गेवराई येथील घाडगे दाम्पत्य हत्या प्रकरण, भिमा कोरेगाव प्रकरण, मराठा क्रांती मोर्चा, विविध समाजाचे निघालेले मोर्चे शांततेत पार पाडण्यात त्यांना यश आले होते. रविवारी कलुबर्मे यांच्या बदलीचे आदेश निघाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्या जागी बारामती (पुणे ग्रामीण) येथून संदीप पखाले हे येत आहेत. पखाले यांच्यासमोर कलुबर्मे यांच्यासारखे कौशल्य दाखवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आव्हान असेल.
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार आणि दुय्यम अधिकारी, कर्मचा-यांच्या सहकार्यामुळेच आपण हे सर्व करण्यात आपण यशस्वी झाल्याचे कलुबर्मे सांगतात.