बीड : गेवराई तालुक्यातील औरंगपूर तांडा पाचेगाव येथील एका १४ वर्षीय मुलीचा बालविवाह पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे २६ वर्षीय तरुणासोबत होणार होता. यासंदर्भात बीडच्या चाईल्ड हेल्प लाईनला माहिती मिळाली. यानंतर, त्यांनी तात्काळ शिक्रापूर पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी तळेगावात धाव घेत हा बालविवाह थांबविला.
जिल्ह्यात बाल विवाहाविरोधात कारवाया होत असल्याने अल्पवयीन मुलींना जिल्ह्याबाहेर नेऊन त्यांचा विवाह लावला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. गेवराईच्या अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची गोपनीय माहिती चाईल्ड लाईनला देण्यात आली. बीडच्या प्रकल्प समन्वयक अश्विनी जगताप यांनी शिक्रापूर पोलिसांना कॉल करुन याची माहिती दिली.
पोलिस वेळीच तळेगावात गेले व चौकशी केली असता संबंधित बालिका, तिचे वडील व लग्न कार्यासाठी जमलेल्या व्यक्तींना ताब्यात घेतले. शिक्रापूर पोलिसांनी अल्पवयीन मुलगी, तिचे आई-वडील यांचे समुपदेशन केले.