बीड : गेवराई तालुक्यातील पाडळसिंगीजवळ महामार्गालगत दोन महिन्याच्या जिवंत मुलीला रस्त्यावर टाकून माता फरार झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या चिमुकलीवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होती. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या चिमुकलीला अहमदनगर येथील शिशुगृहात पाठविण्यात आले. यावेळी सर्वांचेच डोळे भरून आले. पोलीस व डॉक्टर, परिचारीकांनी या चिमुकलीचे ‘बबिता’ असे नामकरणही केले.
‘मुलगी नको’ ही मानसिकताच बदलायला तयार नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. प्रशासनाची जनजागृती कागदावरच राहत आहे. आजही मुलगी झाल्यानंतर तिला बेवारसपणे रस्त्यावर, काट्यात किंवा इतर अडगळीच्या ठिकाणी टाकून निर्दयी माता पलायन करीत आहेत. दोन दिवसांपूर्वीही अशाच दोन महिन्याच्या चिमुकलीला महामार्गालगत टाकून देत माता फरार झाली होती. ग्रामस्थांनी तीला ताब्यात घेत जिल्हा रूग्णालयात दाखल केले. दोन दिवस उपचार घेऊन ठणठणीत झाल्यानंतर तिला गुरूवारी दुपारी अहमदनगर येथील शिशुगृहात पाठविण्यात आले. आरोग्य विभागाकडून पोलिसांकडे सोपविताना या चिमूकलीचे बबिता असे नामकरणही करण्यात आले.
यावेळी उपस्थिती डॉक्टर, पोलीस, परिचारीकांचे डोळे पाणावल्याचे दिसले. डॉ. वर्धमान कोटेचा, डॉ.इलियास शेख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.मोहिणी जाधव, डॉ.नेहा हुसैनी, डॉ.चंदाराणी नरवडे, डॉ.प्रणिता रकटे, डॉ.प्रियंका पवार, परिसेविका वाय.एम.गायकवाड, मोहोर डाके, आशा रसाळ, मिरा नवले, उषा खडके, गेवराई ठाण्याचे महिला सहायक फौजदार सुलोचना वळवी, किशोर इंगोले, दत्ता चव्हाण आदींची उपस्थिती होती.
कुशीत घेताच तिने झाकले डोळेडॉक्टर, परिचारीकांकडून दोन दिवस या बबिताची पूर्ण काळजी घेण्यात आली. तीला नवनवीन कपडे घालण्यात आले. बुधवारीही तिला नवीन कपडे देण्यात आले. कपडे घालताना झोपलेली बबिता उठली. त्यानंतर मोहोर डाके या परिचारीकेने तीला कुशीत घेताच ती पुन्हा झोपली.