बीड : जिल्ह्याचे भुमिपुत्र असलेले पाच हिरे राज्यात चमकले आहेत. तीन अधिकाऱ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक तर दोघांना उपसंचालक म्हणून बढती मिळाली आहे. या सर्वांनाच पहिल्यांदाच हे पद मिळाले असून काम करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.
बीड येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक हुबेकर यांना कोल्हापूर तर गेवराईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.महादेव चिंचोळे यांना धुळे येथे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून पदस्थापना मिळाली आहे. त्यानंतर नांदूरघाट ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.महानंदा मुंडे यांना औरंगाबाद उपसंचालक तर बीडचे भूमिपुत्र आणि सातारा येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांना पुणे उपसंचालक पद मिळाले आहे. तसेच परळी तालुक्यातील बोधेगाव येथील डॉ.मनोहर बनसोडे यांनाही उल्लासनगरला जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून पदस्थापना मिळाली आहे. या पाच जणांसह सहसंचालक, उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी पडले. यात बीडमधील चार हिरे चमकले आहेत. या सर्वांचे स्वागत होत आहे.
पवारांना मिळाली गुणवत्तेवर पदस्थापनाडॉ.आर.बी.पवार हे सामान्य कुटूंबातील आहेत. वैद्यकीय अधिकारी ते उपसंचालक असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. बीड, उस्मानाबाद, नंदूरबार आणि सातारा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. त्यानंतर मुंबई येथे सहायक संचालक म्हणूनही काम केले. त्यानंतर ऊसतोड मजूरांसाठी आयुर्मंगलम योजना, उस्मानाबादमध्ये असताना मातृत्व संवर्धन दिन असे अनेक उपक्रम शासनाच्या मदतीने त्यांनी हाती घेतले होते. लोकसहभागातून राज्यातील पहिले कोरोना सेंटर त्यांनी सुरू केले होते. डॉ.पवार यांची गुणवत्ता व अनुभवाच्या जोरावर शासनाने त्यांना उपसंचालक म्हणून पदस्थापना दिल्याची चर्चा होत आहे.
चिंचोळे, हुबेकरही अनुभवीडॉ.अशोक हुबेकर यांनी रायमोहा ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम पाहिलेले आहे. त्यानंतर जिल्हा प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून शेकडो डॉक्टर, कर्मचाऱ्यांना आरोग्याचे धडे दिले. तर डॉ.महादेव चिंचाळे हे चळवळीतील अधिकारी आहेत. मॅग्मो संघटनेचे राज्याचे अध्यक्ष राहिलेले आहेत. सध्या ते गेवराई उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक आहेत. त्यांनाही प्रशासनाचा तगडा अनुभव आहे. याचा लाभ आता कोल्हापूर आणि धुळे जिल्ह्यातील जनतेला होणार आहे.