- सतीश जोशीबीड : राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शुक्रवारी औरंगाबादेत उद्धव ठाकरेंच्या सभेत व्यासपीठावर उपस्थिती लावल्याने त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेने वेग घेतला. युतीच्या प्रचारासाठी आपण या सभेला उपस्थित होतो. प्रवेशाचा सध्या विचार नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.औरंगाबादेत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी सभा झाली. त्यात क्षीरसागर बंधू शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा सोशल मीडियातून पसरली होती. या पार्श्वभूमीवर आ. क्षीरसागर यांना विचारले असता, आमची एकच भूमिका आहे. आम्ही दोघेही युतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे आहोत. अंबाजोगाईत मुख्यमंत्र्यांच्या सभेसही आम्ही उपस्थित होतो. इथे ठाकरे यांच्या सभेसाठीही आलो आहोत. इतरांप्रमाणे जिल्ह्यात एक आणि राज्यात दुसरी अशी भूमिका आमची नसते, असे सांगत त्यांनी शिवसंग्रामचे आ. विनायक मेटे यांना टोला लगावला.>बीडची जागा कोणाला?विधानसभा निवडणुकीसाठी अजून सहा महिने अवकाश आहे. युती झाल्यास बीडची जागा कोणाला सुटेल, यावर त्यांच्या प्रवेशाचे गणित आहे. शिवसेनेकडून उमेदवारीबाबत शब्द मिळाल्यानंतरच त्यांच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय होईल, असे चित्र आहे.
बीडचे क्षीरसागर बंधू सेनेच्या व्यासपीठावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 5:08 AM