लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मराठवाड्याच्या मातीत गुणवत्ता ठासून भरलीय म्हणून मला विश्वास आहे की माझ्यानंतर येणारी मुलं खूप प्रगल्भ असतील. मला मिळालेला हा सुहासिनी इर्लेकर यांचा आशीर्वाद म्हणजे ‘ये हृदयीचे ते हृदयी’ अशी माझी भावना आहे. या नंतरचा मराठवाड्यातील ‘सुपरस्टार’ हा अधिक स्ट्राँग असेल. बीडच्या भाषेने मला मोठे केले आहे, मी भाषेला मोठे केलेले नाही. बीडकरांचा हा आशीर्वाद प्रेरणा देणारा असल्याची भावना सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय नाट्य परिषद बीड शाखेच्या वतीने स्व.डॉ.सुहासिनी इर्लेकर राज्यस्तरीय नाट्य पुरस्कार भूमिपूत्र सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे यांना आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते शानदार सोहळ्यात बुधवारी प्रदान करण्यात आला. व्यासपीठावर यशवंतराव इर्लेकर, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. दीपा क्षीरसागर, प्रा. डी. एस. कुलकर्णी, जेष्ठ गायक भरत अण्णा लोळगे, प्रा.विद्यासागर पाटांगणकर, कुलदीप धुमाळे, प्रा.कांचन श्रृंगारपुरे, प्रा.संजय पाटील देवळाणकर उपस्थित होते.
बीडच्या शैलीत रामराम घालत मकरंद अनासपुरे यांनी हास्यविनोदात भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, आई ही मुलासाठी कविताच असते. कवयित्रीच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार नातवाला दिलेला पुरस्कार आहे. ऋणानुबंधाचा पुरस्कार हा सर्वात मोठा आहे. पुरस्कार वैयक्तिक नसतात, त्याला खूप हात लागलेले असतात आपण निमित्तमात्र असतो. विद्यार्थीदशेत मुख्याध्यापक मु. घ. कुलकर्णी यांनी एक प्रमाणपत्र छापून एका खोलीत नेवून ते मला दिले होते. हा सर्वात मोठा पुरस्कार आजही आठवणीत असल्याचे ते म्हणाले.
आपल्या मातीचं वेगळेपण वेगळं असतं. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मला बारा वर्ष लागले. बीडमधून मुंबईत गेल्यानंतर एका कंपनीत मला नोकरी करावी लागली, मुलाखतीच्या वेळेस प्रमाणपत्राबरोबरच नाटकात अभिनयासाठी मिळवलेली प्रमाणपत्र दाखवले तेव्हा बाळकृष्ण टायरवाले म्हणाले, तुम्ही दोन वर्ष या अभिनयाच्या शंभर सर्टिफिकेटसाठी काम करा आणि यश मिळाले नाही तर माझ्याकडे या. त्या साऊथ इंडियन माणसाने मला मु. घ. कुलकर्णी सरांइतकाच विश्वास दिला म्हणूनच मी आज हे यश मिळवू शकलो. यशाचे पहिले श्रेय हे मी माझ्या आई-वडिलांना देतो. स्व.इर्लेकरांची कविता ज्यात मृत्यूला दिलेली अलवार साद यातून जिवनाचे तत्वज्ञान शिकलो, अशी भावना अनासपुरे यांनी व्यक्त केली.
या वेळी आ. जयदत्त क्षीरसागर म्हणाले, स्व.सुहासिनी इर्लेकर यांच्या नावाचा पुरस्कार मकरंद अनासपुरे यांना प्रदान झाल्याने पुरस्काराची उंची वाढली आहे. मकरंद आपला बीडचाच. आपल्या लेकराचे कौतूक आपल्या मातीत होत असेल तर ती अभिमानाची गोष्ट आहे. बीडच्या भाषाशैलीमुळे आणि देहबोलीमुळे मकरंदने मिळविलेले यश बीडसाठी अभिमानास्पद असल्याचे ते म्हणाले. चित्रपट क्षेत्रातून नाट्यक्षेत्रात ते पुन्हा आले आहेत. ‘नाम’चे काम स्पृहणीय आहे. मुक्तहस्ते मोकळ्या मनाने त्यांनी मायभूमीसाठी काम केले असून गरुडझेप घ्यावी अशा सदिच्छा आ. क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविक डॉ. दीपा क्षीरसागर यांनी केले. मकरंद अनासपुरे यांनी बोलीभाषा समृध्द आणि लोकप्रिय करुन बीडकरांना अभिमान वाटावा असे कार्य केले आहे. सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलता त्यांनी कृतीत आणली. बीड शहरातील स्वच्छता मोहिमेसाठी ‘नाम’ने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. स्व.सुहासिनी इर्लेकर यांच्या कार्याचा व योगदानाचा सन्मान या पुरस्काराच्या माध्यमातून अ. भा. नाट्य परिषदेच्या बीड शाखेने केला आहे. यावर्षी आपल्याच माणसाचे कौतूक व्हावे यासाठी हा पुरस्कार मकरंद अनासपुरे यांना दिल्याचे त्या म्हणाल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उज्वला वनवे यांनी केले. यावेळी रसिक श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती.