बीड : येथील लेखक आणि नाटककार डॉ. सतीश साळुंके यांनी संस्कार विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी दहा हजार रुपये किंंमतीची ग्रंथसंपदा भेट दिली. डॉ. साळुंके यांच्या ‘उदाहरणार्थ’ या बालनाट्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा एक लक्ष रु पयांचा वाङ्मय पुरस्कार मिळाला होता. त्यापैकी पन्नास हजार रुपये किंमतीची दर्जेदार पुस्तके बीड जिल्ह्यातील विविध शाळा आणि वाचनालयाला देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. साळुंके हे संस्कार विद्यालयात शिक्षक असून त्यांना २००४ मध्ये आदर्श शिक्षकाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे.
संस्कार विद्यालयात झालेल्या एका कार्यक्र मात डॉ. साळुंके यांनी ही पुस्तके विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सुभेदार यांना सुपूर्द केली. यावेळी सुभेदार म्हणाल्या, डॉ. साळुंके यांनी दिलेली पुस्तके दर्जेदार असून महाराष्ट्रातील नामवंत लेखक आणि कवींची असल्याने त्याचा उपयोग निश्चितच शाळेतील विद्यार्थ्यांना होईल. विद्यार्थ्याांनी अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त अन्य पुस्तकांचे वाचन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ललित वाङमय वाचल्याने मुलांची विचार करण्याची क्षमता विकसित होते. तसेच त्यांच्या अभिव्यक्तीला नवीन धुमारे फुटतात. या प्रसंगी बोलताना डॉ.साळुंके म्हणाले की, संस्कार विद्यालयाचे व्यक्तिमत्त्व अन्य शाळांच्या तुलनेमध्ये निराळे आहे. शाळेचे कार्यवाह कालिदासराव थिगळे यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा यामुळे शाळेतील शिक्षकांना सातत्याने नवनवीन उपक्रमासाठी प्रेरणा मिळते. महाराष्ट्र शासनाचे आतापर्यंत आपल्याला वीस राज्य पुरस्कार मिळाले असून त्या यामागे संस्कार विद्यालयाच्या मोलाचा वाटा आहे असेही डॉ. साळुंके त्यांनी यावेळी नमूद केले. ग्रंथपाल महेश सर्वज्ञ यांनी आभार मानले.
बालसाहित्यिकांच्या बालवाङ्मयाचा समावेश
साळुंके यांनी दिलेल्या पुस्तकांमध्ये विविध कथासंग्रह, कवितासंग्रह, मराठी वाङमयाची समीक्षा ग्रंथ आणि विविध नाटकांचा समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्रातील प्रसिद्ध बालसाहित्यिकांच्या बालवाङ्मयाचा समावेश आहे.