बीड : मागील दोन आठवड्यांपासून येथील फळांच्या ठोक बाजारात डाळींबाची मोठी आवक होत आहे. बीड तालुक्यासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील या डाळींबांना केरळ, कर्नाटक तसेच नागपूरच्या व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी आहे.
येथील फळांच्या आडत बाजारात रोज १० ते १६ टन डाळींबाची आवक होत आहे. मुबलक आवकमुळे दरात काहीशी घसरण झाली आहे. सध्या २२ किलो डाळींबाच्या कॅरेटचा भाव ३०० पासून ९५० रुपयांपर्यंत आहेत. रोज ६०० ते ८०० कॅरेटची आवक होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मागील वर्षीपासून येथील काही फळ व्यापाऱ्यांनी धाडस केल्याने डाळींबासाठी बीडची बाजारपेठ नावारुपाला आली आहे.
दरात घसरणठोक बाजारात मागील वर्षी डाळींब कॅरेटचे भाव ११०० ते १५०० रूपये होते. यंदा मुबलक आवक आणि कमी ग्राहकीमुळे हे भाव प्रति कॅरेट ६०० रुपयांनी उतरले आहेत. किरकोळ बाजारात डाळींबाचे भाव ३० ते ६० रूपये किलो दर्जा आणि आकारानुसार आहेत. भाजीच्या दरात डाळींब मिळत असल्याचे फळांचे आडत व्यापारी हारूण अब्बास बागवान यांनी लोकमतला सांगितले.