बीड : पोलीस दलात सलग १५ वर्षे उत्तम सेवा केल्याबद्दल बीड जिल्हा पोलीस दलातील ७ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. १ मे रोजी पोलीस मुख्यालयावर हे सन्मानचिन्ह या सर्वांना सन्मानपूर्वक प्रदान केले जाणार आहे.
पोलीस खात्यात सतत १५ वर्षे उत्तम सेवाभिलेख केल्याने पोलीस महासंचालक एस.के.जयस्वाल यांनी सर्वांना सन्मानचिन्ह देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये बीड जिल्हा पोलीस दलातील माजलगाव शहर ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक बापुसाहेब शांताराम महाजन, आर्थिक गुन्हे शाखेतील सपोउपनि काशिनाथ बन्सी खांडे, पोलीस अधीक्षकांच्या वाचक शाखेतील सपोउपनि संतोष पंडितराव वजुरकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.ह. तुळशीराम सोनाजीराव जगताप, पोह भास्कर गंगाधर केंद्रे, बीड ग्रामीण ठाण्याचे पोह जयसिंग नरसींग वाघ, पोह प्रल्हाद थावरा चव्हाण यांचा यामध्ये समावेश आहे.
१ मे रोजी पोलीस मुख्यालयावर आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हे सन्मानचिन्ह आदरपूर्वक प्रदान केले जाणार आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणे प्रमुख व सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. या सन्मानचिन्हांमुळे जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली आहे. त्यांचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.