सोमनाथ खताळ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाचा आता चेहरामोहरा बदलणार आहे. क्रीडा कार्यालयाने सव्वा तीन कोटी रूपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने बांधकाम विभागाकडे दोन दिवसांत पाठविला जाणार आहे. वॉक, धावण्याच्या ट्रॅकसह सहा कामांचा समावेश यामध्ये असणार आहे.मागील काही महिन्यांपासून जिल्हा क्रीडा संकुलात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच मोडतोड होण्यासह क्रीडा संकुलाची दुरवस्था झालेली आहे. पार्किंगला जागा नसल्याने क्रीडा प्रेमी आडवीतिडवी वाहने उभा करीत असत. याचा त्रास खेळाडू सर्वसामान्यांना होत असे. हाच धागा पकडून जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी संकुलाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सहा कामांचा प्रस्ताव तयार केला. यासाठी जवळपास ३ कोटी २० लाख ३० हजार ५७२ रूपयांचा अंदाजीत निधी प्रस्तावित केला. हा सर्व प्रस्ताव आता तयार केला असून दोन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात येणार आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर व त्यांची टिम सध्या क्रीडा संकुल सुधारण्यासाठी परीश्रम घेत आहेत. हा सर्व खर्च क्रीडा संकुलाच्या निधीतून केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. या सुविधा उपलब्ध झाल्यास खेळाडूंसह क्रीडाप्रेमींना लाभ होणार आहे. तसेच क्रीडांगणही सुसज्ज होऊन खेळासाठी परिपूर्ण होणार आहे.६२ लाखांचा निधी मातीतसाधारण चार वर्षांपूर्वी जिल्हा क्रीडा संकुलात लॉन लावणे, कंपाऊंउ तार उभारण्यासह स्प्रिंकलर व इतर कामांसाठी जवळपास ६२ लाख रूपयांचा निधी खर्च करण्यात आला होता. मात्र, हे काम अतिशय निकृष्ट झाल्याने अवघ्या वर्षभरातच सर्व खराब झाले. त्यामुळे हा सर्व निधी मातीत गेल्याचा आरोप करण्यात आला होता. तत्कालीन क्रीडा आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी याबाबत क्रीडा संकुलाची पाहणी करून अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले होते.
क्रीडा संकुलाची सुधारणे साठी संकुल निधीतून विविध कामांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अस्तिकुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला आहे. स्वाक्षरी होताच तो सार्वजनिक बांधकाम विभागाला देणार आहे. मंजुरी मिळताच टेंडर काढण्यात येणार आहे. साधारण दोन महिन्याचा कालावधी याला लागू शकतो. टेंडरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामास प्रत्यक्ष सुरुवात होईल.-अरविंद विद्यागरजिल्हा क्रीडाअधिकारी, बीड