बीड : बीडच्या मातीतील मुले प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. एनसीसीचे (नॅशनल कॅडेट कॉर्पस्) विद्यार्थीही यात मागे नाहीत. नुकत्याच पार पडलेल्या ट्रेकींग स्पर्धेत बीडच्या सहा विद्यार्थ्यांनी देशात बीडचे नाव गाजवले आहे. पदकांच्या अगदी जवळ पोहचलेल्या या विद्यार्थ्यांना निराशेपोटी जरी परतावे लागले असले तरी त्यांनी या ट्रेकींगसाठी केलेला संघर्ष कौतुकास्पद होता.
कोल्हापूर येथे नुकत्याच आॅल इंडीया ट्रेकिंग कॅम्प पार पडला. देशातील २५० विद्यार्थ्यांची यासाठी निवड झाली होती. बीडमधून शालेय गटात आदित्य बाळासाहेब जगदाळे (शिवाजी विद्यालय), कार्तिक संजय खांडेकर (भगवान विद्यालय), ओम बाळासाहेब शेळके (चंपावती विद्यालय) तर महाविद्यालयीन गटात अभिजित तांदळे (केएसके महाविद्यालय), मनोज लक्ष्मण जागडे व दीपक कदम यांची निवड झाली होती.
या सर्वांनी पन्हाळा ते विशाळगड असा १० दिवस प्रवास केला. देशाच्या कानाकोपºयातून आलेल्या स्पर्धकांना बीडच्या सहाही विद्यार्थ्यांनी झुंजविले. मात्र दुर्दैवाने त्यांना पदकापर्यंत पोहचता आले नाही. पदक मिळाले नाही, म्हणून खचून जावू नका, पुन्हा जोमाने तयारी करा, आणि पुढच्या वर्षी बीडला पदके खेचून आणा, असे मार्गदर्शन एनसीसी शिक्षकांकडून केले जात आहे. चिफ आॅफिसर जे.एस.करपे, फस्ट आॅफिसर सी.एस.भोंडवे, केअर टेकर प्रदीप राठोड, प्रा.बाळासाहेब पोटे हे या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत.
दरम्यान, राष्ट्रीय छात्र सेना हा केंद्र शासनाकडून राबविण्यात येणार उपक्रम आहे. बीडसह जिल्ह्यात विविध शाळांमध्ये ही बॅच आहे. शहरात जवळपास ५०० विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून यामध्ये ३० टक्के मुलींचे प्रमाण आहे. तसेच प्रत्येक सोमवार व मंगळवार असे दोन दिवस पोलीस मुख्यालयावर त्यांची कवायत घेतली जाते. प्रजासत्ताक दिन, स्वांतत्र्य दिन आदी राष्ट्रीय कार्यक्रमादरम्यान, एनसीसीच्या विद्यार्थ्यांची कवायत पाहण्या सारखी असते.
कामगिरी चांगली आहे
आमचे सहाही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पदके मिळाले नसले तरी त्यांनी केलेली ट्रेकींग देशात चांगली होती. पुढच्यावेळेस आम्ही आणखी तयारी करू.- जे.एस.करपे, चिफ आॅफिसर, बीड
विद्यार्थ्यांमध्ये क्षमता आहे आठवड्यातून दोन दिवस परेड घेतली जाते. त्यांना योग्य मार्गदर्शन केले जाते. बीडचे विद्यार्थ्यांमध्ये क्षमता असून ते प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. आमचा एनसीसी विभागही देशात नाव गाजवत आहे. चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न करत आहोत.- एल.एस.भोंडवे, फस्ट आॅफिसर, बीड