बीड/मुंबई - भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडें आणि बीडकरांचे स्वप्न असलेल्या परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाच्या कामाला आता गती मिळणार आहे. कारण, या रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने 527 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी ट्विटरवरुन यासंदर्भात रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. पंकजा यांनी या ट्विटसह एक फोटोही शेअर केला आहे. बीड-नगर-परळी रेल्वे मार्गाचे अत्यंत कठीण स्वप्न पूर्णत्वास येत असल्याचं दिसतंय, असेही पंकजा यांनी म्हटलं आहे.
पंकजा मुंडेंनी यापूर्वीही या रेल्वे मार्गाला अचानक भेट दिली होती, त्यावेळी त्यांनी फोटो आणि व्हिडिओ काढला होता. मुंडेसाहेबांच स्वप्न सत्यात उतरत त्यावेळी पंकजा यांनी म्हटलं होतं. ग्रामविकासमंत्री असताना पंकजा मुंडेंनी 2019 मध्ये आष्टी-पाटोदा तालुक्यातील विकासकामांचे भूमीपूजन करण्यासाठी जात असताना अचानकपणे बीड-परळी-नगर रेल्वे स्थानकाच्या सुरू असलेल्या कामाला भेट दिली होती. त्यावेळी रेल्वे पटरीवर चालण्याचा मोह पंकजा यांना आवरता आला नाही. त्यावेळी, एका व्हिडिओही काढण्यात आला होता, ते सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याच भेटीचा फोटो पंकजा मुंडेंनी आज पुन्हा एकदा शेअर केला आहे. बीडच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्टा करत आहोत, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला जनसेवेंचं व्रत दिलंय. ते व्रत आम्ही कधीच विसरणार नाही. परळी-नगर-बीड रेल्वे मार्गाला 527 कोटी रुपये दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे आभार, असे पंकजा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.