लोकमत न्यूज नेटवर्कबीड : उपजिल्हा, ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यात हद्द निश्चितीचा वाद असतो. आपल्या हद्दीत मयत झालेल्या व्यक्तीचेच आपण शवविच्छेदन करणार, असा काहीसा पवित्रा माजलगाव तालुक्यात घेतला जात असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. आता शवविच्छेदनाअभावी मृतदेहांची हेळसांड होणार नाही. तात्काळ शवविच्छेदन करण्यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. त्यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यात चर्चाही झाली आहे.
चार दिवसांपूर्वीच माजलगाव येथे एकाच रात्री तीन जणांचा विविध कारणांनी मृत्यू झाला. हे सर्व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. परंतु येथे अपुरे मनुष्यबळ असल्याने तब्बल १२ ते १५ तास शवविच्छेदनाअभावी मृतदेहांची हेळसांड झाली. त्यामुळे नातेवाईकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. आरोग्य केंद्र व रुग्णालय यांच्या हद्द निश्चितीच्या वादावरुन अशा घटना घडत असल्याचे दिसून येते. याबाबत ‘लोकमत’ने ‘माजलगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेहांची हेळसांड; हद्दीचा वाद मिटेना’ या मथळ्याखाली २५ मे रोजी वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. संबंधित वैद्यकीय अधीक्षकांसह जिल्ह्यातील सर्वच प्रमुखांना नोटीसा बजावल्या.
रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याबरोबरच मृतदेहांची हेळसांड होणार नाही याची गांभीर्याने काळजी घेण्याचे सक्त आदेशही दिले. त्यामुळे कामचुकारपणा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, आरोग्य सेवा सुरळीत करुन विश्वास जिंकणे हे आव्हान आहे.शवविच्छेदनाची जबाबदारी प्रमुखांचीचजिल्ह्यात तीन उप जिल्हा, १० ग्रामीण रुग्णालये आहेत. तसेच ६० च्या वर प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. रुग्णालय हे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या, तर आरोग्य केंद्रे ही जिल्हा आरोग्य अधिकाºयांच्या अखत्यारीत येतात. असे असले तरी दोन्ही विभाग आरोग्य विभागाच्या अखत्यारीत येतात. असे असले तरी स्थानिक लेव्हलला डॉक्टर व कर्मचाºयांकडून कामामध्ये हलगर्जी व कामचुकारपणा होत असल्याचे वारंवारच्या घटनांवरुन दिसून येत आहे. मृतदेह रुग्णालयात किंवा केंद्रात आल्यानंतर त्याची विटंबना न होऊ देता तात्काळ शवविच्छेदन करण्याची जबाबदारी ही तेथील प्रमुखाचीच आहे. अपुरे मनुष्यबळ, अपुरे साहित्य, अपुरी साधनसामग्री असे कुठलेही कारण न सांगता त्याने परिस्थिती हाताळून शवविच्छेदन करणे क्रमप्राप्त आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
सीएस - डीएचओची बैठकयाच मुद्द्याला धरुन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकृष्ण पवार यांनी तात्काळ बैठक घेतली. सोमवारी उशिरा सर्व प्रमुखांना काळजी घेण्यासंदर्भात पत्रही दिल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक (ग्रामीण) डॉ. सतीश हरिदास हे प्रत्येक रुग्णालयाकडून आढावा घेत आहेत.हलगर्जीपणा करु नका, असे सक्त आदेश डॉ. हरिदास यांनी दिले आहेत.