धारूर तालुक्यातील आरणवाडी साठवण तलावात धार कोंडण्याच्या ठिकाणी सर्रास मुरूमाऐवजी मोठे दगड टाकून काम आटोपण्यात येत होते. हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने जागृत ग्रामस्थांनी हे काम बंद केले. लोकमतने या संदर्भात वृत्त दिले होते. अखेर लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित गुत्तेदाराला वापरलेले दगड काढण्यास सोमवारपासून सुरुवात करायला लावली. हे काम चांगलेच करून घेणार असल्याचे उपअभियंता मुकेशसिंह चौहान यांनी सांगितले.
आरणवाडी येथील साठवण तलावाचे रखडलेले काम आमदार प्रकाश सोळंके यांनी पाठपुरावा करून सुरू केले. हे काम सध्या महत्त्वाच्या भागात व अंतिम टप्प्यात आहे. धार कोंडण्याचे काम सुरू आहे. काळ्या मातीच्या थराच्या बाजूला भिंत मजबूत रहावी म्हणून मुरूमाच्या थराची चांगल्याप्रकारे दबाई करणे आवश्यक असताना या ठिकाणी सर्रास मोठे दगड टाकून काम निकृष्ट दर्जाचे करीत आटोपण्यात येत होते. आरणवाडी येथील जागृत नागरिक बंडू काळे बंजरंग माने, सरपंच लहू फुटने यांनी हे निकृष्ट होणारे काम थांबविण्यास लावले आमदार सोळंके यांच्या निदर्शनास ही बाब आणूण दिली. सोमवारी लोकमतमध्ये याबाबत वृत्त प्रकाशित होताच लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपअभियंता मुकेशसिंह चौहान यांनी तत्काळ दखल घेऊन धार कोंडण्यासाठीच्या भिंतीमध्ये भरलेले दगड काढण्यास सोमवारी सुरुवात केली. हे काम चांगल्याच दर्जाचे करून घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. गुत्तेदारानेदेखील त्यांच्या यंत्रणेमार्फत हे दगड काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
===Photopath===
260421\img_20210426_150224_14.jpg