परळी (बीड ) : परळी वैजनाथ ते खानापुर जंक्शनपर्यंतचा रेल्वे मार्ग सिकंदराबाद रेल्वे डिव्हीजनमधून नांदेड डिव्हीजनला जोडावा, संपुर्ण नांदेड डिव्हीजनच दक्षिण मध्य रेल्वेकडून मध्य रेल्वेला जोडावे, परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनचा आदर्श रेल्वे स्थानक म्हणून विकास व्हावा या प्रमुख मागण्यासह इतर मागण्यांसाठी आज सकाळी परळी रेल्वे संघर्ष समितीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. रेल्वे स्थानकाबाहेर झालेल्या या आंदोलनात विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.
या आधी सुरु असलेली परळी-मुंबई रेल्वे बंद केल्यानंतर पुन्हा रेल्वे सुरु करु असे आश्वासन देऊन ती सुरु करण्यात आली नाही. यामुळे आंदोलनात पहिली मागणी परळी-मुंबई रेल्वेसाठी करण्यात आली. नांदेड-पनवेल ही एक्सप्रेस दररोज करुन मुंबई पर्यंत विस्तारीत करण्यात यावी, उदगीर लातूररोड व परभणी स्टेशन दरम्यान डेमू रेल्वे सुरु करण्यात यावी, तिरुपती हैदराबाद या रॉयलसीमा एक्सप्रेसला निजामाबाद पर्यंत विस्तारीत करण्यात आले आहे, त्याच गाडीला परळी ते विकाराबाद लिंक एक्सप्रेस सुरु करावी यासह परळी ते खानापुर जंक्शनपर्यंतचा रेल्वे मार्ग सिकंदराबाद रेल्वे डिव्हीजनमधून नांदेड डिव्हीजनला जोडावा, संपुर्ण नांदेड डिव्हीजनच दक्षिण मध्य रेल्वेकडून मध्य रेल्वेला जोडावे, परळी रेल्वे स्टेशनचा आदर्श रेल्वे स्थानक म्हणून विकास व्हावा या मागण्या आंदोलकांनी केल्या.
महात्मा गांधी पुण्यतिथीच्या पार्श्वभुमीवर झालेल्या या आंदोलनात मुख्य निमंत्रक मोहनलाल बियाणी, प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष जी.एस.सौंदळे, वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख, चंदुलाल बियाणी, धम्मानंद मुंडे, केशवभाऊ बळवंत, भास्कर रोडे, जिवनराव देशमुख, अनिल मुंडे, संजय आघाव, एन.के. सरवदे, अकबर काकर, सुभाष वाघमारे, ओमप्रकाश बुरांडे यांच्यासह विविध राजकीय संघटनांच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.