बीड : जुगार खेळणाऱ्यांच्या बाजुला उभा होता. पोलिसांनी छापा टाकला असता, ‘तो’ पण यामध्ये अडकला आणि गुन्ह्यात गोवला गेला. गुन्हा दाखल असल्याने चारित्र्य प्रमाणपत्र मिळत नव्हते. केवळ गुन्हा दाखल असल्याने त्याला पोलीस शिपाई पदासाठी भरती होऊनही आठ वर्ष नौकरीपासून वंचित रहावे लागले होते. नुकताचे तो शिपाई बीड पोलीस दलात भरती झाला असून मुख्यालयात कर्तव्य बजावत आहे.
२००८ सालीची घटना. राणू (नाव बदललेले) हा जुगार खेळत असलेल्या ठिकाणी उभा होता. यावेळी अचानक पोलिसांनी धाड टाकली. त्यानंतर पोलिसांनी राणुवर गुन्हा दाखल केला. राणू हा प्रचंड जिद्दी आणि मेहनत करणारा तरूण. याच बळावर तो २०११ साली झालेल्या भरतीत पोलीस शिपाई म्हणून यशस्वी झाला. कागदपत्र पडताळणीत त्याचे चारित्र्य प्रमाणपत्र निगेटिव्ह आले. त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याने त्याला तब्बल आठ वर्ष झगडावे लागले.
या दरम्यान, त्याला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. आर्थिक भूर्दंडही बसला. आता तो या गुन्ह्यातून निर्दाेश सुटल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. तब्बल आठ वर्ष नौकरीपासून वंचित राहिलेल्या राणुला बीड पोलिसांत नुकतेच रूजू करून घेण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
कायदा हातात घेऊ नयेमागील काही दिवसांपासून तरूण मुले कायदा हातात घेत आहेत. अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल होत आहेत. परंतु शासकीय नौकरीत नियूक्ती झाल्यानंतर चारित्र्य प्रमाणपत्र लवकर मिळत नाही. त्यामुळे राणु सारखा संघर्ष करण्याची वेळ येते. त्यामुळे तरूणांनी कसलाच कायदा हातात घेऊ नये. तसेच आपल्यावर गुन्हा दाखल होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे.