लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील १८ प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची २० पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. या जागा भरण्यासाठी बीडच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी लातुरच्या आरोग्य उपसंचालकांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.जिल्ह्यात एकूण ५० प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी असणे गरजेचे आहे. मात्र, तब्बल १८ केंद्रांमध्ये केवळ एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. तर गेवराई तालुक्यातीन चकलांबा येथे तर दोन्ही जागा रिक्त आहेत. ज्या ठिकाणी एकच वैद्यकीय अधिकारी आहे, अशा ठिकाणी बाजूच्या अधिका-यांकडे पदभार दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कामाचा ताण वाढत असून याचा फटका आरोग्य सेवेला बसत आहे. या जागा तात्काळ भराव्यात व आरोग्य सेवा सुरूळीत ठेवावी, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.दरम्यान, मागील काही वर्षांपासून बीड जिल्ह्यातील वैद्यकीय अधिका-यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढणे सार्वजनिक आरोग्य विभागाने गरजेचे आहे.या ठिकाणी हवेत वैद्यकीय अधिकारीकिट्टी आडगाव, सादोळा, अंमळनेर, बर्दापूर, रूईधारूर, राजूरी, मोहा, गंगामसला, शिरूर, टाकरवण, कुंटेफळ, टाकळसिंग, धर्मापूर्री, शिरसमार्ग, कुप्पा या ठिकाणी प्रत्येकी १ तर चकलांबा व डोंगरकिन्ही येथे दोन्हीही जागा रिक्त आहेत.बीएएमएस विद्यार्थ्यांची होणार भरतीप्राथमिक आरोग्य केंद्रामधील वैद्यकीय अधिका-यांच्या रिक्त जागेचा प्रश्न सर्वत्रच आहे. एमबीबीएस डॉक्टर मिळत नाहीत. हाच धागा पकडून आरोग्य विभागाने नुकताच एक शासन आदेश काढला असून रिक्त जागेवर बीएएमएस डॉक्टरांची कंत्राटी पद्धतीवर भरती करण्यासंदर्भात सांगितले आहे. बीड जिल्ह्यात अद्याप कारवाई झालेली नाही.
वैद्यकीय अधिकारी नसल्याने १८ प्रा. आरोग्य केंद्रे आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 12:52 AM