बीड : कमरेला गावठी कट्टा लावून फिरणाऱ्या तरूणाची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यांनी लगेच सापळा लावला. बीड शहरातील तुळजाई चौकात हा तरूण येताच त्याला सापळा लावून पकडले. ही कारवाई मंगळवारी सकाळी करण्यात आली.
राहुल प्रकाश तुपे (वय २७ रा.शिरापूर ता.शिरूर ह.मु.बीड) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. तो कमरेला गावठी कट्टा लावून शहरात फिरत होता. ही माहिती मंगळवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यांनी लगेच राहुलचा शोध घेणे सुरू केले. राहुल हा तुळजाई चौकात असल्याचे समजताच एलसीबीच्या पथकाने सापळा लावला. तो दिसताच त्याला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला कट्टा आढळून आला.
पोलिसांनी तो जप्त केला. सोबत तीन जीवंत काडतुसही जप्त केले आहेत. त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष साबळे, उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, हवालदार मनोज वाघ, प्रसाद कदम, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, सचिन आंधळे, सुनिल राठोड, विकी सुरवसे, नारायण कोरडे आदींनी केली.