लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांच्या मागणीनुसार त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून द्या, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या. ‘लोकमत’ने याबाबबत वृत्त प्रकाशित करून यावर प्रकाश टाकला होता.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा जयश्री मस्के, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, जीवनराव बजगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सूर्यवंशी यांनी दाखल प्रकणाची सविस्तर माहिती जाणून घेतली व आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबांशी संवाद साधला. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी शासनाकडून विहीर, शेळया, म्हशी, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, त्यांच्या विधवा पत्नीला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ शासनाकडून मिळावा, अशा अपेक्षा व्यक्त केल्या.
त्यांच्या मागणीनुसार त्यांना लवकरात लवकर लाभ दिला पाहिजे, यासाठी संबंधित अधिका-यांनी प्रयत्न करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. विविध १६ प्रकरणांवर या बैठकीत चर्चा झाली. बैठकीस समिती सदस्य, संबंधित अधिकारी, आत्महत्याग्रस्त शेतक-यांचे कुटुंबिय उपस्थित होते. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.