- पुरुषोत्तम करवामाजलगाव (जि.बीड) : श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणावर लागत असलेल्या बेलाच्या पानांवर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने सोमवारी महादेवाच्या पूजेसाठी लागणारे बेलपत्र मात्र मिळणे मुश्किल झाले आहे. बेलाच्या पानावर अळ्या पडल्या आहेत. यामुळे सध्या परजिल्ह्यातून बेलपत्र मागविण्याची वेळ विक्रेत्यांवर आली आहे. त्यामुळे भाविकांना आता बेलासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावण महिन्यात भाविकांकडून मोठ्या श्रद्धेने महादेवाची एक महिना सेवा केली जाते. यात अनेकजण एक महिना उपवास करतात, तर काहीजण श्रावण सोमवार धरून आराधना करतात. काही नवसपूर्तीसाठी १०१, ५०१, १००१ बेलपत्र वाहून अभिषेक करतात, तर दर सोमवारी भाविक महादेवाला बेलाचे पान वाहतात. त्यामुळे या बेलाच्या पानाला श्रावण महिन्यात मोठी मागणी असते.
मागील एक महिन्यापासून ढगाळ वातावरण असल्याने बेलाच्या झाडाला आलेल्या पानांवर किडी व अळ्यांचा प्रादुर्भाव पहावयास मिळत आहे. यामुळे बेलाला आलेल्या तीन पानांपैकी एखादे पान किडीने खाल्ल्याने या पानाला महत्त्व राहत नाही. त्यामुळे पान कोणीही घ्यायला तयार नसते. यामुळे झाडाहून पान काढण्यासाठी बेल विक्रेत्यांना कसरत करावी लागत आहे. सध्या माजलगाव तालुक्यात बेलाची पाने मिळणे मुश्किल झाल्याने येथील बेल विक्रेत्यांनी बाहेरील जिल्ह्यांतून श्रावणी सोमवारसाठी बेलाची पाने मागवली आहेत.
माजलगाव तालुक्यात बेलाच्या पानाला कीड लागल्याने दर्जेदार बेलाची पाने मिळणे मुश्किल झाले आहे. यामुळे आम्हाला जालना जिल्ह्यातून बेल मागवावा लागला. यामुळे बेल घेण्यासाठी जादा पैसे मोजावे लागले; परंतु भाविक जादा पैसे द्यायला तयार नाहीत.-ललिता पुजारी, बेल विक्रेत्या, माजलगाव.