परळी : येथील मोंढा मार्केटमध्ये गुरुवारी सकाळी लॉक केलेल्या कारमधून 24 लाख 97 हजाराची बॅग चोरीस गेल्याच्या गुन्ह्याची पोलिसांनी 24 तासाच्या आता उकल केली आहे. याप्रकरणात परळी शहर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथून दोघांना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून एक कार आणि चोरीची रक्कम ताब्यात जप्त केली.
परळी शहरातील मोंढा मार्केटमध्ये औरंगाबादहुन आलेल्या संजय गंगवाल यांच्या कारचे लॉक उघडून 24 लाख 97 हजार रुपयाची बॅग अज्ञात चोरट्याने गुरुवारी सकाळी चोरून नेली होती. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरु केला होता. परळी शहरचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या डीबी पथकाने युद्धपातळीवर तपास सुरू केला. यात सीसीटीव्हीच्या माध्यमातून काही धागेदोरे हाती लागले. एक वाहन व्यापाऱ्याच्या गाडीचा पाठलाग करत असल्याचे दिसले. वाहन क्रमांकावरून पोलिसाच्या एका पथकाने औरंगाबाद येथे जाऊन अधिक तपास केला.
यानंतर परळी पोलिसांनी थेट गंगापूर येथील तुर्काबाद खराडी गाठले. येथे संशयित आरोपी आढळून आले नाहीत. अधिक तपास केला असता दोन्ही संशयित आरोपीस पोलिसांनी वैजापूर येथून ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी चोरी केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून बॅग जप्त केली असून यात 24 लाख 8 हजार रुपये सापडले आहेत. आरोपींना परळी शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. ही कारवाई बीड जिल्हा पोलिस अधीक्षक राजा स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक हेमंत कदम , डी बी पथकाचे जमादार भास्कर केंद्रे, सुंदर केंद्रे, गोविंद भताने, शंकर बुडे सुनील अनमवार यांनी केली.
जुन्या ड्राईव्हरने केला घातआरोपी हे औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद खराडी या गावचे आहेत. यातील एकजण व्यापाऱ्याचा जुना वाहन चालक असल्याचे पुढे आले आहे. आरोपींनी औरंगाबाद येथूनच व्यापाऱ्याचा पाठलाग केला होता. परळीत संधी साधून त्यांनी कारचे लॉक उघडून आतील २५ लाख रुपये असलेली बॅग पळवली असल्याचे पुढे आले असून पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.