बीड : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने संचारबंदीचा निर्णय घेतल्यानंतर बांधकाम कामगारांना १५०० रूपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली होती. मागील काही दिवसांपासून बँक खात्यात ही मदत जमा होत असल्याने या कामगारांना दिलासा मिळाला आहे. काही नसल्यापेक्षा बरे अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मात्र नोंदणी केल्यानंतर नूतनीकरणाकडे दुर्लक्ष केलेल्या ३७ हजार कामगारांना हा लाभ मिळू शकणार नाही, अशी स्थिती आहे. बीड जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांना मागील लॉकडाऊन काळातही (२०२०) पाच हजार रूपयांची मदत दोन टप्प्यात मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार २७ हजार बांधकाम कामगारांना याचा लाभ मिळाला. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या कामगारांना हा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यात ६४ हजार बांधकाम कामगारांनी नोंदणी केलेली आहे. मात्र नोंदणी जीवित ठेवण्यासाठी नूतनीकरण करावे लागते. रोजीरोटीसाठी कामाच्या शाेधात असणारे कामगारांचे मात्र नूतनीकरणाकडे दुर्लक्ष झाले. अनेक कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी बांधकामासह ऊसतोडी व बिगारी कामांसाठी स्थलांतर करतात. यात महिला, पुरूष कामगारांचा समावेश आहे. त्यामुळे नोंदणी न करणाऱ्या कामगारांची संख्यादेखील मोठी आहे. तर एकदा नोंदणी केल्यानंतर त्याचे नूतनीकरण न झाल्याने ३७ हजार कामगारांना लाभ मिळू शकणार नसल्याचे सध्यातरी दिसते.
गतवर्षीची मदत अद्याप काही कामगारांच्या खात्यावर केवळ तांत्रिक अडचणींमुळे मिळालेली नाही. यात बँक डिटेल्स चुकीचे असणे, बँकांचे विलीनीकरण झाल्याने आयएफसी कोड बदल, पतसंस्था, लहान - बँकांमध्ये खाते असणे अशा या अडचणी आहेत. त्या दुरुस्त केल्या जातात. तर नूतनीकरणासाठी एक वर्षांचा अवधी असल्याने अनेक कामगारांचे नूतनीकरण प्रक्रियेत आहे.
-------
लहान- मोठे काम मिस्त्रीकाम, मजुरीचे काम करतो. गाव तसेच लगतच्या इतर गावात कामे करत होतो. परंतु रोज काम मिळत नाही. लॉकडाऊनमुळे सध्या तर काम बंद आहे. मागील वर्षी ५ हजार रूपये शासनाकडून मिळाले. तर ८-१० दिवसांपूर्वी १५०० रूपये जमा झाले. - भगवान नामदेव वाघमारे, कामगार, गोळेगाव, ता. गेवराई.
-------------
बांधकामाचे जे काम मिळेल ते करताे. दोन वर्षांपूर्वी कार्यालयात नोंदणी केली होती. या वर्षात कामाच्या खूप अडचणी आल्या. कधीतरी काम मिळत आहे. मागच्या वर्षी आधी दोन हजार नंतर तीन हजार रूपये मदत मिळाली होती. यावेळी १५०० रूपये मिळाले. - उमाकांत सदाशिवअप्पा बेदरकर, कामगार, बीड.
---
मी बांधकामावर मजुरीचे काम करतो. ते नसल्यास शेतमजुरी करतो. सध्या कडक लॉकडाऊनमुळे कामे बंद आहेत. मागे दोन व तीन हजार असे पाच हजार रूपये मिळाले. पाच- सहा दिवसांआधी १५०० रूपये खात्यावर जमा झाले. सरकारला सगळ्यांचा विचार करावा लागणार आहे, त्यामुळे आले तेवढे बरे. - कैलास क्षीरसागर, साक्षाळपिंप्री, ता. बीड
------------
जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या बांधकाम मजुरांची संख्या - ६४०००
नूतनीकरणासह जीवित नोंदणी बांधकाम मजूर संख्या - २२०००
नूतनीकरण न केलेले बांधकाम मजूर- ३७०००
--------