बीड : शहरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धेाक्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या डेंग्यूचे ६५, तर चिकुनगुनियाचे तब्बल २० रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. यातील जवळपास रुग्ण हे बीड शहरातीलच आहेत. धूर फवारणीसह इतर उपाययोजना करण्यात पालिका अपयशी ठरल्यानेच साथरोग वाढत असल्याचे दिसत आहे. तसेच मलेरिया विभागाकडूनही जनजागृती व उपाययोजना करण्यात आखडता हात घेतला जात असल्याचे दिसते.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून साथरोगांनी पाय पसरायला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागातील साथरोग आटोक्यात आली असली तरी बीड शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे. शहरात सर्वत्र असलेली घाण आणि पालिका व आरोग्य विभागाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे डेंग्यू, चिकुनगुनिया यासारख्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. तसेच नागरिकही गाफील राहत असल्याचे काही ठिकाणी दिसत आहे. प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन साथरोग निर्मूलनासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
---
मोमीनपुरा, शाहूनगरात जास्त रुग्ण
शहरातील मोमीनपुरा व व शाहूनगर भागात जास्त रुग्ण आढळल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. या भागात अबेटिंग, गप्पी मासे सोडण्याची कार्यवाही केली जात आहे. असे असले तरी अद्याप हे साथरोग आटोक्यात आले नसल्याचे दिसून येत आहे.
--
काय आहेत लक्षणे
डेंग्यू - थंडी वाजणे, भरपूर ताप येणे, अंगावर लालसरपणा येणे, लघवी व शौचामधून रक्त येणे, शौचास येणे, उलटी होणे अशी लक्षणे आहेत
चिकुनगुनिया : सांधेदुखीसह ताप, थंडी येणे. तसेच शौचास बसता न येणे.
--
पालिकेची यंत्रणा करतेय काय?
बीड शहरात स्वच्छतेसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाते. परंतु, तरीही गल्लीबोळांसह रस्त्यावर कचरा पडलेला दिसतो. तसेच नाल्याही तुंबलेल्या दिसतात. घंटागाड्या वेळेवर येत नाहीत. नाल्यातून काढलेला कचरा तत्काळ उचलला जात नाही. यामुळेच शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
---
सीओंकडून ना आढावा, ना भेटी
शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेले असतानाही मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे कोरोनाच्या भीतीने घराबाहेर पडत नाहीत. तसेच ते कार्यालयातही पूर्णवेळ बसत नाहीत. शहरात भेटी देणे तर दूरच. परंतु, साधा आढावा घेण्याची तसदीही डॉ. गुट्टे घेत नसल्याचे दिसत आहे. सीओच घरात बसल्याने कर्मचारीही कामाकडे दुर्लक्ष करत आहेत. लोकप्रतिनिधींकडून केवळ राजकारण केले जात आहे. समस्यांबद्दल कोणीच बोलायला तयार नसल्याचे चित्र शहरात आहे.
---
आमच्याकडून जनजागृतीसह गप्पी मासे सोडणे, अबेटिंग करण्याची कार्यवाही केली जात आहे. तसेच नागरिकांनाही कोरडा दिवस पाळण्याबाबत आवाहन केले जात आहे. दैनंदिन सर्वेक्षण आणि धूर फवारणीही केली जाते.
डॉ. मिर्झा बेग, जिल्हा हिवताप अधिकारी बीड
--
स्वच्छतेसाठी सर्वांना सूचना केलेल्या आहेत. तसेच ज्या भागातील तक्रारी येतील, त्या ठिकाणच्या स्वच्छता निरीक्षकांना नोटीस बजावली जाते. घंटागाड्याही वेळेवर पाठविण्यास सांगितलेले आहे.
डॉ. उत्कर्ष गुट्टे, मुख्याधिकारी न.प. बीड
--
डेंग्यूचे उपचाराखालील रुग्ण - ६५
चिकुनगुनियाचे रुग्ण - २०