बीड : कोरोनासारखाच आता डेंग्यूचाही व्हायरस बदलत असल्याचे दिसत आहे. अंगात ताप नसतानाही डेंग्यू पॉझिटिव्ह आल्याचे उदाहरणे समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेसह सकस आहार घेऊन आराम करण्यावर भर द्यावा. तसेच रोगप्रतिकारशक्ती स्ट्राँग राहण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
पावसाळा सुरू झाला की साथरोगांमध्ये वाढ होते. अस्वच्छता, ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होती. त्यामुळे डेंग्यू, चिकुनगुनियासारख्या आजारांना निमंत्रण मिळते. मागील आठ महिन्यात जेवढे रुग्ण आढळले नव्हते, त्याच्या बरोबरीने रुग्ण चालू महिन्यात आढळले आहेत. आतापर्यंत ३२ डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांची नाेंद आरोग्य विभागाकडे झाली आहे.
दरम्यान, व्हायरस हा नेहमीच बदलत असतो. असे असले तरी शासनाकडून बीडच्या मलेरिया विभागाला अद्याप तरी व्हायरस बदलला असून उपाययोजना करा, असे अधिकृत पत्र आलेले नाही. तरीही नागरिकांनी स्वच्छता, आहार, व्यायाम आणि आराम करून रोगप्रतिकारशक्ती स्ट्राँग ठेवण्यासाठी काळजी घेण्याची गरज आहे.
---
ताप नसला तरी पॉझिटिव्ह
मागील दीड वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातलेले आहे. सर्दी, ताप, खोकला अशी याची लक्षणे आहेत. परंतु काही लोकांना असे काहीच लक्षणे नसताना कोरोना पॉझिटिव्ह आल्याची उदाहरणे आहेत. या डेंग्यूबाबतही आता असेच घडत आहे. ताप नसतानाही काही लोक डेंग्यू पाॅझिटिव्ह येत असल्याचे सांगण्यात आले. अशा रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्याने त्यांना लक्षणे जाणवत नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.
---
घाबरू नका, काळजी घ्या
याबाबत जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. मिर्झा बेग यांच्याशी संपर्क केला. डेंग्यूचा व्हायरस हा बदलतच असतो. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली ते पाॅझिटिव्ह आले तरी ७ दिवसांत बरे होतात. जास्तीत जास्त २१ दिवस उपचार घेऊन ते ठणठणीत होतात. मागील काही दिवसांत मृत्यूदर कमी झाला आहे. व्हायरस बदलल्याचे अधिकृत असे काहीच आलेले नाही. परंतु नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोणतेही औषधी न घेता डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ते घ्यावेत, असेही डॉ. बेग यांनी सांगितले.
---
जानेवारी ते ऑगस्टपर्यंत आढळलले डेंग्यूचे रुग्ण ४३
१ ते २२ सप्टेंबरदरम्यान आढळलेले डेंग्यू रुग्ण ३२
गुरुवारी घेतलेले नमुने ९०
सार्वाधिक रुग्ण असलेला परिसर - बीड शहर