अंबाजोगाई : गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार डीजे बंदीचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट घुमल्यास संबंधितांवर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या चौकशीनतंर गुन्हे नोंदवून कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिला. तसेच विसर्जनाच्या दिवशी जर कोणी लपूनछपून मद्याची विक्री करताना आढळून आले तर त्यांच्यावर थेट हद्दपारीची कारवाई करण्याचा इशारा पोद्दार यांनी दिला.मंगळवारी अंबाजोगाई येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तरूणाईने अल्पकाळाच्या आनंदासाठी डिजे बंदीचे उल्लंघन करून स्वत:चे भवितव्य अंध:कारमय करू नये असे आवाहन पोद्दार यांनी केले. उपविभागातील ज्या मंडळांनी अद्याप परवाना घेतला नाही त्यांनी लवकर घ्यावा अन्यथा विसर्जनानंतर अशा मंडळांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोद्दार म्हणाले. अंबाजोगाई व परळीत विसर्जनस्थळी जीवरक्षक जवानांची नियुक्ती केली आहे. तगडा बंदोबस्त नियुक्त केला आहे. विशेषत: अन्य धर्मीयांच्या प्रार्थना स्थळाबाहेर बॅरीकेट्स आणि पोलिसांचे संरक्षक कडे असणार आहे. त्यामुळे नागरीकांनी निर्भय वातावरणात आनंदाने आणि शांततेत विसर्जनात भाग घ्यावा असे आवाहन पोद्दार यांनी केले. यावेळी अपर अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी बंदोबस्ताची माहिती दिली.६८९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईअंबाजोगाई आणि परळी तालुक्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ४०३ गणेश मंडळे आहेत. पोलीस विभागाने ५४ बैठका घेऊन शांततेचे आवाहन केलेले आहे. तसेच ६८९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून एकाच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मागील २० दिवसात दारू आणि जुगार अड्यांवर ४५ धाडी टाकण्यात आल्या आहेत. विसर्जन मिरवणूकीदरम्यान हुल्लडबाजी, धिंगाणा, गोंधळ घालणारांवर कडक कारवाई करण्यात येईल. या काळात कर्तव्यात कसूर करणाºया पोलीस कर्मचा-यांवर कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे हर्ष पोद्दार म्हणाले.
खबरदार ! गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजला तर....!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:58 PM
विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट घुमल्यास संबंधितांवर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या चौकशीनतंर गुन्हे नोंदवून कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिला.
ठळक मुद्देहर्ष पोद्दार : लपून दारू विकणाऱ्यांवर हद्दपारीची कारवाई होणार