बीड : प्राथमिक आरोग्य केंद्रात गैरहजर राहणे आता वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच अंगलट येणार आहे. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून एमसीआय नियमानुसार चक्क संबंधित डॉक्टरची एमबीबीएस पदवी रद्द करण्याचा इशारा दिला आहे. तशी नोटीसही पाटोदा तालुक्यातील अंमळनेरच्या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना शनिवारी बजावली आहे. यामुळे कामचुकार डॉक्टरांचे चांगलेच धाबे दणाणले असून त्यांना पाठिशी घालणाऱ्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
पाटोदा अंमळनेर येथील काही नागरिकांनी आरोग्य केंद्रातील डॉक्टर कायम गैरहजर असतात. तसेच ते मुख्यालयी राहत नाहीत, अशा तक्रारी वरिष्ठांकडे केल्या होत्या. या समस्यांवर ‘लोकमत’ने प्रकाश टाकला. त्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना स्वत: नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. तसेच यापुढे कोठेही रूग्णसेवेबद्दल तक्रार येणार नाही, याची काळजी घेण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सुचना केल्या आहेत.
दरम्यान, आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून सेवा देणे बंधनकारक आहे. गत आठवड्यातच पाटोद्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एल.आर.तांदळे यांनी सर्वांना नोटीस बजावली होती. मात्र हा केवळ पाहुणचार झाला. ‘लोकमत’ने उलटतपासणी केली असता एकही डॉक्टर मुख्यालयी राहिलेला नाही. डॉ.तांदळे यांनी मात्र, डॉक्टर मुख्यालयी राहत असल्याचे सांगितले. केवळ वारंवार नोटीसा देऊन वरिष्ठही सुरक्षित राहत असल्याचे दिसून येत आहे.
काय आहे एमसीआयची नियमावली?कर्तव्यात कसुर केल्यास प्रोफेशल मिसकंडक्ट अंतर्गत आरोग्य विभाग एमसीआयकडे (मेडिकल कौन्सील आॅफ इंडिया) प्रस्ताव पाठवू शकतो. त्याची चौकशी करून सिद्ध केल्यास पदवी रद्द होऊ शकते. असा हा गंभीर नियम आहे.
माहिती असतानाही कारवाई नाहीमुख्यालयी एकही डॉक्टर राहत नाही, हे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना चांगलेच माहिती असते. मात्र, त्यांच्याकडून कामचुकारांना अभय दिले जाते. याचा फटका सामान्यांना बसून त्यांना नाईलाजाने खाजगी दवाखाना गाठावा लागतो. रूग्णांचे हाल होण्यास केवळ वैद्यकीय अधिकारीच नव्हे तर त्यांना पाठिशी घालणारे तालुका आरोग्य अधिकारीही जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.
प्रकार चव्हाट्यावर आल्याने भितीआरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आल्यानंतर कामचुकार तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पायाखाली वाळू सरकली आहे. सोशल मिडीयावर रान उठवित खोट्या अफवा पसरवून आपण किती चांगले, हे दाखविण्याचा वरिष्ठांसमोर प्रयत्न केला जात आहे. हेच त्यांच्या अंगलट येत असून वरिष्ठांनी या कामचुकारांची चांगलीच कानउघडणी केल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.
एमओंप्रमाणे टिएचओंवरही कारवाई व्हावीवैद्यकीय अधिकारी अॅडजेस्टमेंट करतात, मुख्यालयी राहून सेवा बजावत नाहीत, हे अनेक ठिकाणचे वास्तव आहे. मात्र, काही तालुका आरोग्य अधिकारीही मोठ्या प्रमाणात कामचुकारपणा करतात. बीडमधून कारभार हाकतात. टिएचओंचा वचक नसल्याचे आरोग्य केंद्रातील कारभार ढेपाळला आहे. एमओंप्रमाणेच टिएचओंवरही कारवाई करण्याची मागणी सामान्यांमधून होत आहे.