लोकमत न्यूज नेटवर्क
वडवणी : पावसाळ्यातील दूषित पाण्यामुळे अतिसार, गॅस्ट्रो, काॅलरा हे जलजन्य आजार मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी सतर्क राहावे. आजारी रुग्णाला योग्य उपचार करावेत, अशा सूचना वडवणी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. एम. बी. घुबडे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
जलजन्य आजारावर वेळीच उपचार झाले नसल्यास गंभीर स्वरूपात आजार फैलावतो. यामुळे पावसाळ्यातील आजार टाळण्यासाठी पिण्याचे पाणी उकळून आणि गाळून प्यावे. जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नये. गॅस्ट्रोसारखा आजार हा वेगवेगळ्या प्रकारच्या जिवाणूंच्या प्रसारामुळे होत असतो. यात प्रथम उलट्या आणि जुलाब एकाच वेळी सुरू होतात. अतिसार हा आजार जिवाणू आणि विषाणूंमुळे होतो. यात प्रामुख्याने जुलाब होतात. या आजाराची काळजी करण्यासाठी ओआरएसचे पाणी रुग्णास द्यावे. आरोग्य कर्मचाऱ्यांंनी व ग्रामीण भागातील नागरिकांना निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी आजाराबाबत सतर्क राहावे, असे आवाहनही डॉ. घुबडे यांनी केले आहे.