- अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांचे अंबाजोगाईकरांशी भाविनक नाते जुळले होते. अंबाजोगाईच्या धार्मिक वातावरणाशी ते समरस झाले होते. इतकेच नाही तर इथल्या डोंगरदऱ्यात व जंगलात असलेल्या शिवालयांमध्ये त्यांनी अनुष्ठानही केले होते. अंबाजोगाईकरांशी त्यांच्या जुळलेल्या नात्यामुळे त्यांच्या निधनाची वार्ता धडकताच अंबाजोगाईकरही सुन्न झाले. त्यांच्या सहवासातील अनेक अठवणींना उजाळा मिळाला.
अंबाजोगाई हे प्राचीन व ऐतिहासिक शहर आहे. अंबाजोगाईच्या परिसरात डोंगरदऱ्यात व जंगलात शिवालयांची व मंदिरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आद्यकवी मुकुंदराज, संत सर्वज्ञ दासोपंत यांचा अध्यात्मिक वारसा शहराची महती जगभर प्रसिद्ध करतो. आजतगायत अनेक त्यागी महापुरूषांना अंबाजोगाईत ज्ञानप्राप्त झाल्याचे सांगितले जाते.आध्यात्मिक गुरू भैय्यूजी महाराज यांचाही अंबाजोगाईशी संपर्क आला व त्यांचे अंबाजोगाईकरांशी भावनिक नाते जुळले. १९९९ ते २००० या कालवधीत भैय्यूजी महाराज यांनी अंबाजोगाई परिसरातील डोंगरदऱ्यात व जंगलात असलेल्या रेवलनाथ, नागनाथ, बुट्टेनाथ या शिवालयांमध्ये अनेकवेळा अनुष्ठान केले.
आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी संत सर्वज्ञ दासोपंत यांची समाधी अंबाजोगाई शहरातील काशीविश्वनाथ मंदिर, अमृतेश्वर मंदिर, सकलेश्वर मंदिर अशा विविध मंदिरांना ते सातत्याने भेटी देत असत. भय्यूजी महाराज हे स्वत: शिवभक्त असल्याने अंबाजोगाई परिसरातील विविध शिवालयांशी त्यांचे धार्मिक नाते जुळले होते. या मंदिरांविषयी त्यांना कमालीची ओढ होती. अंबाजोगाईच्या बुट्टेनाथ परिसरात वनस्पती औषधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या औषधी वनस्पती उपयोगात आणण्यासाठी या भागात आयुर्वेद रूग्णालय स्थापन करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता. मात्र त्यांची ही इच्छा अधुरीच राहिली.
भैय्यूजी महाराज यांचे अंबाजोगाई येथील भक्त अर्जुन वाघमारे व रोहित देशमुख हे त्यांच्यासोबत अंबाजोगाई व परिसरात सावलीसारखे फिरत. अंबाजोगाईचा ऐतिहासिक व धार्मिक वारसा जगाच्या नकाशावर आणण्यासाठी भैय्यूजी महाराजांच्या मनात अनेक उपाययोजना होत्या. याबद्दल त्यांनी अनेकांकडे संकल्पना मांडल्या. मात्र त्यांच्या जाण्याने या सर्व बाबी राहून गेल्याची हुरहूर भक्तगणांमध्ये आहे. भैय्यूजी महाराजांच्या अकाली निधनाने जिल्हाभरातील शिष्यगणांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
कुटुंबाचे अविभाज्य घटक होतेराष्ट्रसंत भैय्यूजी महाराज माझ्या कुटुंबाचे अविभाज्य घटक होते, ते आता आपल्यात नाहीत. मला आणि त्यांच्या असंख्य अनुयायींना हा फार मोठा धक्का आहे. मला ते नेहमी 'अक्का साहेब' म्हणून संबोधायचे. या अशा घटना मनाला फार वेदना देऊन जातात.- पंकजा मुंडे, ग्रामविकास मंत्री
दिशादर्शक हरपलाअध्यात्मिक गुरु भैय्यू महाराज यांनी अध्यात्म तसेच सामाजिक आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांच्या शब्दाला मान होता. त्यांच्या जाण्याने समाज मनाला दिशा देणारा दिशादर्शक हरपला.- आ. विनायक मेटे
धक्कादायक आहेअध्यात्मिक गुरू, भैय्यूजी महाराज यांच्या निधनाची वार्ता धक्कादायक आहे. अध्यात्मिक क्षेत्रात कधीही भरुन येणार नाही इतकी हानी झाली आहे. आत्महत्या केलेल्या असंख्य कुटुंबांना ज्यांनी आधार दिला. बीड जिल्ह्यात त्यांनी जलसिंचन,भूमिसुधार अभियान, दुष्काळाचा सामना करण्यासाठी समाज उपयोगी कार्यक्रम राबवले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ईश्वर चरणी प्रार्थना.- आ. जयदत्त क्षीरसागर