धारूर : तालुक्यातील घागरवाडा येथे शहीद परमेश्वर बालासाहेब जाधवर (२६) यांच्या पार्थिवावर गुरूवारी सांयकाळी पाच वाजता साश्रुनयनांनी शेकडोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्य दल व पोलिस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम , परमेश्वर जाधवर अमर रहे या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
१९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सैनिकी युद्ध सरावादरम्यान परमेश्वर जाधवर यांना वीरमरण आले होते. गुरूवारी दुपारी तीन वाजता सुभेदार अंकुश वळकुंडे यांच्यासह पथकाने जैसलमेर येथून पार्थिव घागरवाडा येथे आणले. यावेळी गाव सुन्न झाले होते. गावच्या भूमीपुत्राला निरोप देण्यासाठी अख्खे गाव प्रतीक्षा करत होते. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी आरणवाडी फाट्यापासून फुलांनी सजविलेल्या सैन्य दलाच्या वाहनातून गावापर्यंत देशभक्तीपर घोषणा देत पार्थिव आणले. ग्रामपंचायत समोर प्रांगणात पार्थिव ठेवल्यानंतर प्रथम सैन्य दल व नंतर पोलीस दलाने सलामी दिली. यानंतर गावातून पार्थिव नियोजित स्थळाकडे नेले. येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.राजकीय, सामाजिक, प्रशासनातर्फे पुष्पचक्र अर्पणयावेळी आ. प्रकाश सोळंके, माजी खा.आनंदराव आडसूळ, माजी आ. केशव आंधळे, रमेश आडसकर, नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी, मोहनराव जगताप, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे यांनी तर प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर, तहसीलदार व्ही. एस. शेडोळकर, नायब तहसीलदार सुहास हजारे, रामेश्वर स्वामी, जिल्हा सैनिक कल्याण संघटक अंगद तांबे , पोलीस निरीक्षक विश्वनाथ नाईकवाडे, गटविकास अधिकारी सोपान अकेले, पं. स. चे सभापती उमाकांत सोळंके, बाजार समितीचे सभापती महादेव बडे, उपसभापती सुनील शिनगारे ईश्वर मुंडे, हनुमंत नागरगोजे, नितीन नागरगोजे, विठ्ठल शिनगारे, बाळासाहेब कुंरूद, ग्रामसेवक विजय गायसमुद्रे, माजी सैनिक संघटनेचे दत्ताभाऊ शिनगारे आदींनी पुष्पचक्र अर्पण केले.चिमुकलीला पाहताना हेलावलेशहीद परमेश्वर जाधवर यांना अंतिम निरोप देताना दीड वर्षाची कन्या विद्या हिने वडिलांना जलदान केले. लहान भाऊ विक्रम याने अग्निडाग दिला. आईला चिटकून रडणाऱ्या चिमुकलीला पाहून उपस्थितांचे मन हेलावले.