लोकमत न्यूज नेटवर्कबीड : चो-यांच्या घटना वाढल्याने शहरात मोठ्या प्रमाणात गस्त वाढविली आहे. अशातच अंकुशनगर भागात काही संशयित व्यक्ती असल्याचा फोन पोलिसांना आला. यावर बार्शी नाक्यावरून पोलीस अवघ्या पाच मिनिटांत अंकुशनगरमध्ये पोहचले. परंतु कोणीच दिसले नाही. यावरून पोलिसांची पाच मिनिटांत मदत मिळू शकते, हे दिसले.
दोन दिवस चोरट्यांंनी बीडमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सर्व ठाणेप्रमुखांसह विशेष पथके शहरात गस्त घालत आहेत. गल्लीबोळ्या पिंजुन काढत आहेत. अशातच अंकुशनगर भागात काही संशयीत व्यक्ती असल्याचा संशय या भागातील रहिवाशांना आला. यावर नागरिकांनी तात्काळ पोलिसांना फोन केला. बार्शी नाक्यावर गस्त घालणारे पोलीस उपअधीक्षकसह चार्ली व इतर पथके तात्काळ घटनास्थळी पोहचले. परंतु त्यांना येथे कोणीच दिसले नाही. हाती जरी कोणी लागले नसले तरी पोलीस पाच मिनीटांत आपल्यापर्यंत पोहचू शकतात, याची खात्री पटली. नेहमीच अशाप्रकारे गस्त घालून पोलिस तत्पर राहिल्यास चोरींना नक्कीच आळा बसेल, तसेच इतर गुन्हेही घडणार नाहीत, असे बोलले जात आहे.