नितीन कांबळे
कडा (बीड): गेल्या पाच ते सहा वर्षापासून बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी अमिया फाट्याजवळ असलेल्या एका गोडाऊनमध्ये भेसळयुक्त दुध तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरचा ६०० गोण्या असलेला साठा अन्न सुरक्षा प्रशासन व पोलिसांनी धाड टाकुन जप्त केल्याची कारवाई रविवारी पहाटे करण्यात आली.एकाला ताब्यात घेण्यात आले असून अंबादास पांडुरंग चौधरी रा.टाकळी अमिया असे त्याचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील अंबादास पांडुरंग चौधरी याचे कडा येथील टाकळी अमिया रोडलगत साईदत्त एंटरप्राययजेस नावाने दुकान व लगत पत्र्याच्या शेडमध्ये गोडाऊन आहे. गोपनिय माहितीच्या आधारे अन्न व पोलीस प्रशासनाने रविवारी पहाटे या ठिकाणी धाड टाकली. गोडाऊनची पाहणी केली असता भेसळयुक्त दुधाची निर्मिती करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरचा मोठा साठा आढळून आला. या कारवाईने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी संदिप देवरे,अनुराधा भोसले,सहाय्यक आयुक्त कांबळे,आष्टीचे पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे,सहायक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे, स्थानिक गुन्हे शाखा,पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, पोलीस हवालदार बबुशा काळे,पोलीस नाईक प्रवीण क्षीरसागर, विकास जाधव अंमलदार मजरूद्दीन सय्यद, सचिन गायकवाड, दिपक भोजे, सचिन पवळ, महिला अंमलदार जिजाबाई आरेकर,अर्चना आरडे, यानी केली.
जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रविवारी दिवस उगवायच्या आत जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.