परळी : राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात बुधवारी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी थकित वेतनाच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन केले त्यामुळे कारखान्याचे गाळप बुधवारी होऊ शकले नाही .दरम्यान दुपारी वाटाघाटी करण्यासाठी कारखान्याचे संचालक, आधिकारी ,भाजपाचे पदाधिकारी व आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करीत असताना वाद निर्माण झाला .त्यामुळे या वेळी वाटाघाटी यशस्वी झाले नसल्याचे सांगण्यात आले
परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा यावर्षीचा हंगाम चालू झालेला आहे. राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी अत्यंत नाजुक परिस्थितीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना यंदा चालू ठेवला आहे.काही प्रमाणात कर्मचाऱ्यांचे वेतन ही अदा केले आहे .परळी परिसरात वैद्यनाथ साखर कारखान्या मुळे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात क्रांती झाली . शेतकरी, ऊस उत्पादकांचे जीवनमान कारखान्यामुळे उंचावले आहे या परिसरातील अनेक बेरोजगारांना. वैद्यनाथ कारखान्याने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ साखर कारखाना आशिया खंडात नावा रुपास आला होता. या पूर्वी विक्रमी ऊस गाळप व साखर उत्पादनात वैद्यनाथ कारखान्याला विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी थकित पगारीसाठी कारखाना प्रशासनास एक निवेदन ही दिले होते. कर्मचारी, कामगारांनी बुधवारी काम बंद आंदोलन करून ऊस गाळप थांबविले आहे. दुपारी कर्मचारी शिष्टमंडळ व कारखान्याचे शिष्टमंडळ यांच्यात चर्चा चालू होती. या चर्चेत मार्ग निघत असतानाच वाद निर्माण झाल्याचे कळते, या संदर्भात वैद्यनाथ साखर कारखान्याचे संचालक व भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष डॉ शिवाजीराव गुट्टे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कर्मचाऱ्यांशी चर्चा चालू आहे लवकरच मार्ग निघेल.
कारखान्याच्या अध्यक्षा, माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगार यांचे हीत लक्षात घेऊन वैद्यनाथ कारखाना सुरू करण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण दुर झाली आहे. आर्थिक आणि नैसर्गिक आपत्तीमुळे वैद्यनाथ कारखाना अडचणीत आला होता. मात्र माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी यावर्षी कारखाना सुरू करून यशस्वीरित्या चालू केला आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने सन 2020-21 या गळीत हंगामात गेल्या महिन्यात 2 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले असुन 1 लाख 75 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे तर सरासरी साखर उतारा 10. 44 टक्के असल्याचे कारखान्याच्या वतीने सांगण्यात आले.
काही कर्मचाऱ्यांकडून वैद्यनाथ कारखान्यात गोंधळपरळी , वैद्यनाथ साखर कारखान्यात बुधवारी राष्ट्रवादी समर्थक असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी मारामारी करून गोंधळ घातला. हा प्रकार म्हणजे चांगल्या प्रकारे सुरू असलेल्या कामात खिळ घालण्याचा तसेच शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचा प्रकार आहे असे कारखान्याचे संचालक शिवाजीराव गुट्टे, व्यंकटराव कराड, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे यांनी म्हटले आहे. वैद्यनाथ साखर कारखाना मागील काही दिवसांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. कर्मचाऱ्यांच्या बंद काळातील पगारीबाबत त्यांनी केलेल्या मागणीवर विचार सुरू होता. कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी नुकत्याच परळी दौर्यात याविषयी सकारात्मक भूमिका घेतली होती. कारखान्याचे एमडी औरंगाबादला गेले हे साधून काही कर्मचाऱ्यांनी बुधवारी वजन काटा बंद केला व धुडगूस घालण्यास सुरवात केली. कामावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली तसेच दादागिरी करून एकही कर्मचारी जागेवर ठेवला नाही. पंकजाताई मुंडे यांनी यंदा कारखाना सुरू व्हावा म्हणून अथक परिश्रम घेतले. सरकारकडून विशेष कर्ज मंजूर करून आणले. हा विषय सोडवण्यासाठी कारखान्याचे संचालक शिवाजीराव गुट्टे, व्यंकटराव कराड, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, हनुमंत नागरगोजे, माऊली साबळे, चंद्रकांत देवकते आदी प्रयत्न करत होते.