बीड : किराणा दुकानांसाठी तसेच भाजी, फळे, दूध विक्रीसाठी दोन तासांचा दिलेला अवधी अत्यंत कमी असल्याने बाजारावर वपरित परिणाम झाला. दोन तासात ठोक खरेदी किरकोळ विक्री कशी करायची? असा प्रश्न आहे. घरपोच किराणा पोहोच करण्यासाठी किती वेळ लागणार याची शाश्वती नाही. त्यात घरपोहच माल देण्यासाठी मुनीमाकडे पासची सुविधा नाही. किराणा व्यापाऱ्यांनी यामुळेच आपले व्यवहार बंद ठेवले. दूधही नासले
बीड शहरात रोज दीड लाख लिटर दूध विकले जाते. लगतच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात दूध उत्पादक शेतकरी रतीब घालतात. परंतु त्यांच्यासाठी मोठा ग्राहक असणारे सर्वच हॉटेल बंद असल्याने दूध शिल्लक राहत असून ते नासण्याची भीती आहे, तर विक्री न झाल्याने मोठा आर्थिक फटका दूधविक्रेत्यांना सहन करावा लागत आहे.
------
टमाटा ३, तर वांगी २ रुपये किलो
दहा दिवसांआधी २० रुपये किलो विकणारा कांदा ठोक बाजारात दहा रुपये तर बटाटा ५ ते ८ रुपये किलोप्रमाणे विकला. टमाट्याचे २० किलोची क्रेट ७० रुपयांना, वांगीचे क्रेट ५० रुपयांना विकावे लागले. मेथी, शेपू १०० रुपये, तर पालक, कोथिंबीर जुडी ५० रुपये शेकडा विकली. १५ रुपये विकली जाणाऱ्या काकडीला ५ ते ७ रुपये किलोप्रमाणे भाव मिळाला. शेवग्याचा भावही ५ ते ८ रुपये किलो होता. रवादार दिसणाऱ्या फ्लॉवरची १५ किलोची बॅग ५० ते १०० रुपये किलो विकली गेली. मिरचीचे दरही कमालीचे घसरले.
फळांच्या बाजारातही दरामध्ये मोठी घसरण दिसून आली. पिकविलेला भाजीपाला सडण्यापेक्षा विकलेला बरा म्हणत शेतकऱ्यांनी आपला माल विकला.
-----
डोळ्यात पाणी येतंय
बीडच्या होलसेल भाजी मार्केटमध्ये रोज १५ ते २० टन भाजीपाला येतो. लॉकडाऊन सुरू असलेतरी तेवढाच भाजीपाला येत आहे. मात्र ग्राहकी नसल्याने तसेच रोजचे किरकोळ विक्रेते अल्प खरेदी करत असल्याने भाव घसरले आहेत. मातीमोल भाव मिळत असल्याने डोळ्यात पाणी येतंय, लॉकडाऊनमुळे शेतकरी आणि आमचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया भाजीपाला आडत बाजाराचे उपाध्यक्ष हुसेन जाफर बागवान यांनी व्यक्त केली.