- संजय खाकरे परळी: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी उभारलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाची निवडणूक बिनविरोध होण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे व माजी मंत्री धनंजय मुंडे हे बहीण-भाऊ या निवडणुकीत एकत्र येणार आहेत.
माजी चेअरमन पंकजा मुंडे यांना पुन्हा चेअरमनपदाची संधी मिळणार आहे. त्यांची व अन्य संचालक पदाच्या दहा जागा बिनविरोध निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संचालक पदाच्या एकूण 21 जागे पैक्की अकरा जागा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या गटाला तर त्यांचे बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गटाला दहा जागा दिल्या जाणार असल्याची चर्चा गेल्या चार दिवसांपासून सुरू झाली आहे.
जागा वाटपाचा 10 -11 चा फॉर्मुला या निवडणुकीत राहील असा अंदाज जाणकाराकडून व्यक्त केल्या जात आहे. यामध्ये वैद्यनाथ कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन फुलचंद कराड यांनी स्वतः व पत्नी सुमन कराड यांचा उमेदवारी अर्ज भरला असून आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
दरम्यान, २१ जागांच्या निवडणुकीसाठी एकूण ५० अर्ज दाखल झाले आहेत. यावेळी प्रज्ञा मुंडे यांच्यासह तिन्ही मुंडे भगिनी निवडणुकीसाठी सज्ज झाल्या आहेत. वैद्यनाथसाठी प्रज्ञा मुंडे, पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडे यांनी अर्ज भरले मात्र, प्रतिस्पर्धी आ. धनंजय मुंडे यांनी अर्ज दाखल केला नव्हता. यामुळे ही निवडणूक वेगळ्या फॉर्मुल्याने लढवली जाईल याची चर्चा राजकीय अभ्यासक व्यक्त करत होते.