बीड : शिवसंग्रामचे नेते तथा माजी आ. स्व. विनायक मेटे यांचे लहान भाऊ रामहरी मेटे यांनी शिवसंग्रामला रामराम ठोकत स्वतंत्र संघटना उघडली आहे. जय शिवसंग्राम या संघटनेच्या माध्यमातून काम करून मेटे साहेबांचे विचार सामान्यांपर्यंत पोहचवणार असल्याचे रामहरी यांनी सांगितले. त्यांच्याकडे आगोदर युवा जिल्हाध्यक्ष पद होते. परंतू मेटे यांच्या निधनानंतर त्यांनी हे पद सोडले होते. शिवंग्राममधील अंतर्गत धुसफूस आणि होत असलेली घुसमट यामुळेच त्यांनी वेगळा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मेटे बाहेर पडणे हे शिवसंग्रामला मोठा धक्का समजला जात आहे.
विनायक मेटे हे विधान परिषद सदस्य होते. त्यांनी शिवसंग्रामच्या माध्यमातून सामान्यांसाठी आवाज उठविला, अनेक प्रश्न मार्गी लावले. मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर ते पुढे असत. दुर्दैवाने १४ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर अपघातात त्यांचे निधन झाले. वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाल्यानंतर संघटनेची सर्व जबाबदारी त्यांची पत्नी डॉ.ज्योती मेटे यांच्या खांद्यावर आली. तसेच मेटे यांच्या निधनानंतर युवा जिल्हाध्यक्ष तथा मेटे यांचे लहान बंधू रामहरी मेटे हे पदावरून बाजूला झाले.
मागील काही दिवसांपासून ते शिवसंग्रामपासून दोन हात लांब होते. ते नाराज असल्याचीही चर्चा होती. शिवसंग्राममध्ये ठराविक लोकांचीच जास्त चलती आहे, असे त्यांनी अनेकदा कार्यकर्त्यांजवळ बोलून दाखविले होते. त्यामुळेच त्यांनी राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांशी बोलून शिवसंग्राममधून बाहेर पडत जय शिवसंग्राम ही स्वतंत्र संघटना उघडली आहे. शिवसंग्राममधून बाहेर पडल्याची घोषणा त्यांनी गुरूवारी केली. यामुळे शिवसंग्रामला मोठा धक्का बसला आहे.
मी बाहेर का पडलो? हे नंतर सांगतोशिवसंग्राममधून मी बाहेर पडलो, हे खरे आहे. मी आता जय शिवसंग्राम या संघटनेच्या माध्यमातून स्व.मेटे साहेबांचे विचार सामान्यांपर्यंत पाेहचेल. तसेच त्यांनी उभारलेला लढा पुढे नेईल. राज्यभरातील अनेक लोक माझ्यासोबत आहेत. मी बाहेर का पडलो? हे नंतर सांगतो. सध्या थोडा कार्यक्रमात आहे.- रामहरी मेटे, बीड