Santosh Deshmukh Murder Case: महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ज्या घटनेमुळे ढवळून निघालं ते सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. कारण या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या सुदर्शन घुले याच्यासह जयराम चाटे आणि महेश केदार या तिघांनी पोलिसांकडे हत्येची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. खंडणी आणि खुनाच्या घटनेतील महत्त्वाचे तपशील समोर आल्यानंतर या तीनही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते.
"पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागण्यात संतोष देशमुख हे मुख्य अडथळा होते. तसंच प्रतिक घुलेच्या वाढदिवशीच त्यांनी आणि मस्साजोग गावातील ग्रामस्थांनी पवनचक्की कंपनीच्या बाहेर आम्हाला मारहाण केली. तसंच त्याचे व्हिडिओ व्हायरल केल्याने आम्ही हे पाऊल उचललं," अशी कबुली सुदर्शन घुले याने दिल्याची माहिती आहे. तसंच देशमुख यांच्या हत्येआधी हॉटेल तिरंगा इथं विष्णू चाटेसोबत बैठक घेतल्याचंही घुलेने कबुल केलं आहे.
दुसरीकडे, संतोष देशमुख यांना मारहाण करत असताना व्हिडिओ चित्रित केल्याचं आरोपी महेश केदार याने मान्य केलं आहे. आरोपींनी दिलेल्या या कबुलीमुळे वाल्मीक कराडसह सर्व गँगवरील खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोप निश्चिती करण्याचा सरकारी वकिलांचा मार्ग सुकर होण्यास मदत होणार आहे.
आरोपींच्या वकिलांचा दावा काय?
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात काल झालेल्या सुनावणीत आरोप निश्चिती करण्यात येऊ नयेत, अशी मागणी बचाव पक्षाने कोर्टाकडे केली आहे. "उज्ज्वल निकम यांनी सांगितलेली सर्व घटना याचे सीडीआर आणि लोकेशन पुरावे वारंवार सांगितले जात आहेत. परंतु, यातील काहीच आम्हाला मिळालेले नाही. हे मिळावे यासाठी आम्ही मागील तारखेला अर्ज केलेला आहे. आजही अर्ज केला आहे. हे पुरावे, मिळाल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. चार्ज फ्रेम करता येणार नाही. निकम म्हणतात म्हणून केस ओपन झाली, असे नाही. गोपाल कृष्ण केसचा संदर्भ दिला. कागदपत्रे मिळाल्यावर अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा," अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली आहे.