बीड : एटीएम कार्डचे क्लोनिंग करून बँक खात्यातून पैसे काढणारी बिहारची टोळी बीड पोलिसांच्या सायबर विभागाने कारवाई करून जेरबंद केली असून, त्यांच्याकडून क्लोनिंगसठी लागणाऱ्या साहित्यासह चारचाकी वाहन असा ७ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील पंचशीलनगर भागात राहणारे भीमराव पायाळ यांच्या बँक खात्यातून अज्ञात व्यक्तीने ८० हजार रुपये लंपास केले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ३१ डिसेंबर २०२० रोजी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सायबर विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. तपासादरम्यान पायाळ यांच्या खात्यातून क्लोनिंगद्वारे दादर (मुंबई) येथील एटीएमधून पैसे काढण्यात आल्याचे दिसून आले. त्यादृष्टीने तपास केंद्रित करण्यात आला. यातील आरोपी बिरू राजेंद्र पांडे (रा. मायापुरी, जि. गया बिहार), सतीषकुमार नंदलाल प्रसात (रा. बडकी डोल्हा, जि. गया ), मोहम्मद अद निरम खान (रा. मंजोलीगाव, जि. गया ह. मु. नालासोपारा, मुबंई), मोहम्मद जावेद जब्बार खान (रा. मंजोलीगाव) सर्व आरोपी बिहार राज्यातील आहे. यांनी हा गुन्हा केल्याचे उघड झाले होते. मात्र त्यांना पकडण्याचे आव्हान होते. मात्र सायबर विभागाची धडपड सुरू होती.
या प्रकरणातील आरोपी ९ फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत तपास करणाऱ्या टीमला मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक आर. राजा, अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने शिर्डी येथे सापळा रचून चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींकडून ७ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये एक चारचाकी व क्लोनिंगसाठी लागणाऱ्या साहित्याचा समावेश आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस विभागाचे प्रमुख पोनि रवींद्र गायकवाड, पोउपनि निशिगंधा नाचण, पोना अनिल डोंगरे, संतोष म्हेत्रे, शेख आसेफ, बप्पासाहेब दराडे, पोशि अविनाश गवळी, मपोशि सुनीता शिंदे व बीड पोलीस ठाणे पोना कांबळे, किरण पवार, बाळकृष्ण रहाडे व चालक दुधाळ यांनी केली.
७४ एटीएम कार्ड हास्तगत
शिर्डी येथे आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून विविध बँकांचे ७४ एटीएम कार्ड तसेच एटीएम क्लोन करण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्र, एक कार, लॅपटॉप, वेगवेगळ्या कंपनीचे १० मोबाईल असा एकूण ७ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.