बीड : जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे सत्र सुरुच असल्याचे चित्र आहे. दरम्यान, तीन ठिकाणांवरून दुचाकी चोरी झाल्याच्या घटना घडल्या असून, विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील स्वराज्य नगर भागातील रहिवसी भारभूषण वारंगुळे यांनी त्यांची दुचाकी (क्र.एमएच २३ एजी ९४८७) घराच्या पार्किंमध्ये उभा केली होती. ती अज्ञात चोरट्याने ९ मे रोजी लंपास केली. शोध घेतला परंतु मिळून न आल्यामुळे १२ मे रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना बीड शहर पोलीस ठाणे हद्दीत घडली. बहिरवाळ यांनी त्यांची दुचाकी जिल्हा रुग्णालय परिसरात उभा केली होती. त्याठिकाणावरून ती चोरून नेली, याप्रकरणी बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल आहे तर, तिसरी घटना परळी शहरातील संभाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली, बरकतनगर भागातील रहिवासी शेख वाहेद शेख जिलानी यांनी त्यांची दुचाकी (क्र.एमएच २२ एई १८३४) ही घराच्या जवळ उभा केली होती. ती अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना उघडकीस आल्यानंतर संभाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, मोठी टोळी जिल्ह्यात सक्रिय असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर, पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.