बीड : जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे सत्र सुरुच असल्याचे चित्र आहे. विविध ठिकाणावरून तीन दुचाकी चोरी गेल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांना आव्हान देत चोरटे दुचाकी चोरी करत आहेत.
गेवराई तालुक्यातील किनगाव फाट्याजवळ कृष्णा भिमराव गायकवाड यांनी त्यांची दुचाकी (क्र.एमएच २३ बीए ९१७९) ही दुचाकी उभी केली होती. ती अज्ञात चोरट्याने लंपास केली. यावेळी दुचाकीत ठेवलेला मोबाईल देखील चोरीस गेला. दुचाकी व मोबाईल मिळून ३५ हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी गायकवाड यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना अंबाजोगाई शहरातील रहिवासी अशोक रामभाऊ दळवे हे त्यांची दुचाकी (क्र.एमएच ४४ आर ७८४६) ही घेऊन लाईटचे सामान खरेदी करण्यासाठी दुकानात गेले होते. दुकानाच्या बाहेर लावलेली त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चाेरून नेली. याप्रकरणी दळवे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तिसरी घटना परळी शहरात घडली. शिवाजीनगर भागात राहणारे मनोज जैन हे त्यांची दुचाकी (क्र.एमएच ३० व्ही २४४८) घेऊन कामानिमित्त बाहेर आले होते. यावेळी औद्योगिक विकास महामंडळाच्या पार्किंगमधून चोरट्याने दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी परळी ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दुचाकी चोरीचे रॅकेट
जिल्ह्यातील विविध शहरांमधून दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दुचाकी चोरीचे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे दुचाकी चोरी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने सखोल तपास करून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.