बीड : तब्बल तीन महिन्यांनंतर शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण सोमवारी पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर मंगळवारी कडेचा आणि मधला सांडवा ओसंडून वाहू लागला आहे. दरम्यान, येत्या काळात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यास संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
बिंदुसरा धरणाची एकूण साठवण क्षमता ७.९० दशलक्षघन मीटर इतकी असून ०.७९ दलघमी मृत साठा आहे, तर ७.११ दलगमी उपयुक्त साठा आहे.
धरण भरल्यामुळे परिसरात पाऊस झाल्यास पाण्याची आवक वाढून विसर्गदेखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सर्व यंत्रणांना जलसंपदा विभागाने कळविले असून नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना नगरपालिकेने ध्वनिक्षेपकावरून दिलेल्या आहेत.
---------
बिंदुसरा धरण भरल्याने परिसरात येणाऱ्या हौशी लोकांना प्रतिबंध करण्यासाठी पाटबंधारे विभागाचे दोन कर्मचारी नियुक्त केले असून संबंधित पोलीस ठाण्याशी पत्रव्यवहार सुरू आहे. नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने दक्षता घ्यावी. - विजय पाखरे, उपविभागीय अधिकारी तथा शाखा अभियंता,जलसंपदा विभाग, बीड.
----------
असा होता विसर्ग सुरू
सोमवारी सकाळी सहा वाजता बिंदुसरा धरण भरले. दरम्यान, पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच होता. त्यामुळे पाण्याची आवक सुरू होती. सोमवारी दोन्ही सांडव्यावरून विसर्ग सुरू होता. कडेच्या सांडव्यावरून ४०सेंटीमीटर, तर मधल्या सांडव्यावरून ५ सेंटीमीटर पाण्याचा विसर्ग सुरू होता.
----------