गढी (ता. गेवराई जि. बीड ): जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर आवश्यक असला तरी शेणखत, कम्पोस्ट खते दुर्मिळ होऊ लागली आहेत. यावर पर्यायी उपाय म्हणून गेवराई तालुक्यातील जय भवानी सहकारी साखर कारखान्याने घट्ट मळी म्हणजेच प्रेसमडपासून बायो कम्पोस्ट खतनिर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. हे खत दरवर्षी वापरले तर रासायनिक खतांची मोठी बचत होईल व तसेच याचा उपयोग कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, भुईमूग तसेच डाळिंब, मोसंबी फळबागेस होणार आहे.
मळीपासूनचे बायो कम्पोस्ट खत शेतीत फायद्याचे ठरू शकते. हे ओळखून शेतकऱ्यांच्या हितासाठी व उसाच्या उत्पादनात भरघोस वाढीसाठी बायो कम्पोस्ट खत उत्पादन करणाऱ्या मशीनचे उद्घाटन कारखान्याचे संचालक भास्करराव खरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगन्नाथराव शिंदे, संचालक श्रीराम आरगडे, जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे, जगन्नाथराव दिवाण, शेतकी अधिकारी जगन्नाथ शिंदे, डिसलरी इन्चार्ज राजेंद्र बडे, ऊस पुरवठा अधिकारी सुदाम पघळ, अधीक्षक आर. बी. ठोसर यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
बायो कम्पोस्ट खतातील प्रमुख सेंद्रिय अन्नद्रव्यामुळे प्रतिएकरी उत्पादनात भरघोस वाढ होते.
वेगळे सूक्ष्म अन्नद्रव्य देण्याची गरज राहत नाही.
खतांमध्ये संतुलित अन्नद्रव्याचा वापर असल्यामुळे कीड व रोगासाठी ऊस पिकामध्ये प्रतिकारक्षमता वाढते.
उसाची उगवण, एकसमान जोमदार फुटवे फुटण्याची क्षमता व कांड्याची लांबी व जाडीमध्ये भरघोस वाढ होते. या प्रेसमडचे रासायनिक पृथक्करण केले असता १.५ ते १.७ टक्के नत्र, १.५ ते. ६ टक्के स्फुरद, १.० ते ५.२ टक्के पालाश आणि २ ते २.३ टक्के गंधक ही पोषण अन्नद्रव्ये आढळतात. तसेच कम्पोस्ट खतामध्ये गंधकाचे प्रमाण असल्याने चोपन जमीन सुधारण्यास याचा उपयोग होतो. या खताचा वापर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात करावा असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव पंडित, विद्यमान चेअरमन अमरसिंह पंडित व माजी चेअरमन जयसिंग पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यामध्ये तयार होणाऱ्या उपपदार्थांपैकी प्रेसमड केकचा उपयोग सेंद्रिय खत व भूसुधारक म्हणून चांगला होऊ शकतो. हे कम्पोस्ट खत दरवर्षी वापरले तर रासायनिक खतांची मोठी बचत होईल, असे जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे यांनी सांगितले.