एक हजारामागे जन्मदराची सरासरी ९३८, दहा वर्षांपूर्वी जन्मदर होता ८५०च्या घरात
पुरुषोत्तम करवा लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : तालुक्यात गेल्या आठ वर्षांमध्ये मुलींच्या जन्मदराची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील आठ वर्षांमध्ये एक हजार मुलांमागे मुलींची संख्या सरासरी ९३८ एवढी झाली आहे. दहा वर्षांपूर्वी ही संख्या ८५० च्या घरात होती. मुलांच्या जन्मदराबरोबर मुलींचा जन्मदर येत असल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. महाराष्ट्र शासनाने दहा वर्षांपूर्वी मुलींचा जन्मदर झपाट्याने घटत होता. डॉक्टरांकडूनही सर्रास लिंगनिदान होत असल्याने व याचा परिणाम म्हणून गर्भपात करणाऱ्यांची संख्या वाढत गेली. याचा परिणाम म्हणून दिवसेंदिवस मुलींची संख्या घटत गेली. मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी झाले. एक हजार मुलांच्या तुलनेत केवळ ८५० ते ८७५ मुलींचा जन्म होऊ लागला. लिंगनिदान होत असल्याने गर्भपाताच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यानंतर शासनाने अनेक लिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईची मोहीम उघडली. यामुळे डॉक्टरांकडून नियमानुसारच सोनोग्राफी होऊ लागल्या. पुढील काळात मुलींची संख्या वाढावी म्हणून शासनाने मोठ्या प्रमाणावर जनजागृतीदेखील केली. याचा परिणाम दिवसेंदिवस मुलींच्या संख्येत वाढ पाहायला मिळाली. माजलगाव येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयांतर्गत मागील आठ वर्षांत मुलींच्या जन्मदरात चांगलीच वाढ झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या कार्यालयांतर्गत २०१३ ते २०२१ या आठ वर्षांत मुलींच्या जन्मदरात चांगलीच वाढ झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. २०१५-१६ व २०१९-२० यावर्षी हा जन्मदर ९५५ पर्यंत गेला होता. २०१६ मधील सप्टेंबर महिन्यात मुलींचा जन्मदर १ हजार २४७ ,२०१५ च्या सप्टेंबर व २०१७ च्या डिसेंबर महिन्यात हा जन्मदर १ हजार १८८ पर्यंत गेला होता. ----- मागील आठ वर्षांचा मुलींचा जन्मदर असा... २०१३-१४ -९१२, २०१४-१५ -९४४, २०१५-१६ -९५५, २०१६-१७ -९५०, २०१७-१८ -९०२, २०१८-१९ -९४०, २०१९-२० -९५५, २०२०-२१ -९४९ ------ मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून बालविकास प्रकल्प कार्यालयामार्फत प्रत्येक अंगणवाडी केंद्रांवर ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ या अंतर्गत वारंवार जनजागृती केली जाते. याचबरोबर किशोरवयीन मुली व गर्भवती महिला यांच्यात वारंवार बैठका घेऊन त्यांच्यात जनजागृती केली जात आहे. याचा परिणाम मुलींच्या जन्मदरवाढीवर होत आहे. यापुढेही जनजागृतीचे प्रयत्न पुढे चालू ठेवणार आहे.
-आर. एस. बुडुख, प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी, माजलगाव