बीड : भाजप सरकारने व मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यात ११ हजार कोटी रुपयांची गुंवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाचे काय झाले, भाजप सरकारने मराठवाड्याचे नुकसान केले आहे, अशी टीका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. ते बीड येथे सोमवारी घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयी संकल्प मेळाव्यात बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले हा विजयी संकल्प असून, भारतीय जनता पार्टीच्या विर्सजनाची देखील सभा आहे. मराठवाडा दुष्काळाच्या छायेत आहे, याच मराठवाड्यात उद्योगधंदे उभारण्यासाठी ११ हजार कोटी गुंतवणूक करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मात्र मराठवाड्यातील युवकांना फसवण्याचे काम या देवेंद्र आणि नरेंद्र सरकारने केले आहे. त्यामुळे मराठवाड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बेरोजगारांची संख्या वाढत आहे. दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे मराठवाड्याला विशेष पॅकेज देण्याची मागणी यावेळी जयंत पाटील यांनी केली. १५ व्या वित्त आयोगाने दिलेल्या अहवालात सांगितले आहे की, विकासाच्या दृष्टीने मराठवाडयातील शेतकरी, युवक, नौकरदार हे मागास आहे. तरी देखील शासनाकडून कुठलीही ठोस उपाययोजना मराठवाड्याकरता राबवली जात नाही. त्यामुळे या सरकारला धडा शिकवण्याची वेळ आल्याचे जयंत पाटील यावेळी म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांचा मराठवाड्यावर राग
देशात इंधन दरवाढ झाली, त्यामुळे नागरिकांचे कंबरडे मोडले, महागाई वाढली आहे इंधनाचे दर ९० रुपयांच्या पुढे गेले आहे. या दरवाढीमध्ये देखील मराठवाड्यातील नांदेड व परभणीत इतर ठिकाणांपेक्षा इंधन दर अधिक आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मराठवाड्यावर राग असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.