बीड : महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ व त्यांच्या आंदोलनाबाबत केंद्र सरकारच्या असंवेदनशीलतेच्या निषेधार्थ बीड शहरात सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजपा हटाव बेटीयाँ बचाव आंदोलन केले. भाजप खा. बृजभूषण शरण सिंह यांना अटक करून त्यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची सखोल चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.
भाजपा सरकार आपल्याच पक्षाच्या एका खासदारापुढे हतबल झाले असून सव्वा महिन्यापासून महिला कुस्तीपटू भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष तसेच भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप करून राजधानी दिल्लीच्या रस्त्यावर ठाण मांडून बसल्या आहेत. मात्र त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात आले. भाजप खा. बृजभूषण शरण सिंह यांना अटक करून त्यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची सखोल चौकशी करावी व महिला कुस्तीपटूंना न्याय द्यावा या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी भाजपा हटाव बेटीयाँ बचाव आंदोलन केले भाजपा हटाव-बेटीयाँ बचाव, महिला कुस्तीपटूंना न्याय मिळालाच पाहिजे, बृजभूषण यांना अटक झालीच पाहिजे अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
आंदोलनात शेख युनुस, बलभीम उबाळे, शेख मुबीन, शेख मुस्ताक, भीमराव कुटे, धनंजय सानप आदी सहभागी होते. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्यामार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना निवेदन देण्यात आले.