बीड: राज्याच्या राजकारणातील दोन मोठे नेते आणि भाऊ-बहिण असलेले पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यात नेहमीच शाब्दिक चकमक झालेली पाहायला मिळते. नुकतंच धनंजय मुंडेंनी पंकजांवर बीड जिल्ह्याची बदनामी केल्याचा ठपका ठेवला होता. त्यावर आता पंकजा मुंडे यांनी पलटवार केला आहे.
'तो माझा अखेरचा क्षण असेल'बीड येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना त्या म्हणाल्या, ''माझ्या काळात एकही माणूस माझ्यापासून दुरावला नाही. माझे ऑपरेशन झाले, बोलायला घसा दुखतोय, तरीदेखील मी बोलतेय. चांगली कामे केली पाहिजे, करुन घेतली पाहिजे. मी बीडसाठी खूप काही केले, पण बीडच्या बदनामीचे खापर माझ्यावर फोडले. बीडच्या बदनामीचे काम मी कधीच केले नाही, तसे काम केले तर तो माझा शेवटचा क्षण असेल'', असा पलटवार पंकजा मुंडेंनी केला.
'तोपर्यंत फेटा घालणार नाही...'यावळी पंकजांनी राज्यातील ओबीसी आरक्षणावरही भाष्य केले. ''जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मी फेटा घालणार नाही. विरोधक माझ्यावर खोटे आरोप करतात, पण माझ्याकडे कोणतेही फार्म हाऊस नाही, मोठे ऑफिसही नाही. राजकारणात ज्यांचा अहंकार जास्त असतो, त्याचा पराभव झाल्याशिवाय राहत नाही. सरकारमधील लोकांनी अतिशय वाईट कामे केली आहेत, त्यांचा पराभव झाल्याशिवार राहणार नाही'', अशी टीकाही यावेळी केली.