विकासाच्या मुद्द्यावरून बीडमध्ये पुन्हा एकदा राजकारण तापताना दिसत आहे. भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी यापूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता खासदार प्रीतम मुंडे यांनी विकासाच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला. आपण जे टगे पोसत आहात ते कोणत्या कामाची बिलं काढतायत याचा अंदाज घेतला तर विकासाची कामं कोण करतंय हे स्पष्ट होईस, असं म्हणत प्रीतम मुंडे यांनी बीडच्या पालकमंत्र्यांवर निशाणा साधला.
"दसरा मेळाव्याबाबत यावेळी उत्साह आहे. हा मेळावा कष्टकरी आणि भगवान बाबांच्या अनुयायंचा आहे. गेल्यावर्षी गुन्हे दाखल करण्यात आले. बीडमध्ये सध्या खालच्या पातळीचं राजकारण सुरू आहे. मेळाव्यानंतर जिल्ह्यात अनेक कार्यक्रम झाले, जेसीबीनं फुलं उधळली गेली, परंतु त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही," असं प्रीतम मुंडे म्हणाल्या.
जिल्ह्यात फिरत असताना पालकमंत्र्यांनी रस्ते कोणी केले हे पाहिलं पाहिजे. आपण जे टगे पोसतोय ते कोणत्या कामाची बिलं काढतायत याचा अंदाज घ्या. जिल्ह्यात काय आणलं हे पाहायचं असेल तर परळी नगरपालिकेच्या बाहेर पडून पाहा, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. दरम्यान, बीडमध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्यावर पंकजा मुंडे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. "दसरा मेळावा हा कोणत्या जातीपातीचा आणि कोणत्या वर्गाचा नाही. हा कष्टकऱ्यांचा आणि वंचितांचा मेळावा आहे. या ठिकाणी येणारा कार्यकर्ता विचारांची ऊर्जा घेऊन जातो," असं पंकजा मुंडे याबाबत बोलताना म्हणाल्या.