बीड : गेवराई मतदार संघातील भाजप आमदार ॲड.लक्ष्मण पवार यांनी सरकारी यंत्रणेवर विश्वास दाखवत आपल्या पायाची शस्त्रक्रिया उपजिल्हा रूग्णालयात केली. साधारण दीड वर्षापूर्वी शेतात गेल्यावर चालताना त्यांच्या उजव्या पायातील टाचेत काचेचा तुकडा घुसला होता. त्यामुळे कुरूप तयार झाले होते. याचाच त्रास होत असल्याने त्यांनी बुधवारी उपजिल्हा रूग्णालयात धाव घेत शस्त्रक्रिया करून घेतली. सरकारी यंत्रणेवर विश्वास असल्याने शस्त्रक्रिया केल्याचे ते सांगतात.
साधारण दीड वर्षांपूर्वी ॲड.पवार हे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. चालत असतानाच त्यांच्या उजव्या पायातील टाचेत काचेचा तुकडा घुसला. त्यांनी घरी आल्यावर तो टोकरून काढण्याचा प्रयत्न केला, परंतू निघाला नाही. नंतर पट्टी लावूनही काढण्यासाठी प्रयत्न केले, परंतू यश आले नाही. परंतू मागील आठवड्यापासून त्यांना वॉकींग करताना याचा त्रास जाणवू लागला. त्यांनी याबाबत गेवराई उपजिल्हा रूग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेश शिंदे यांना कल्पना दिली. डॉ.शिंदे यांनी मंगळवारी तपासणी करून गुरूवारी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनाही माहिती दिली. डॉ.साबळे हे सर्जन असल्याने बुधवारी गेवराईला जावून त्यांनी आमदार पवार यांच्या पायाची शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया छोटी असली तरी आमदारांनी सरकारी यंत्रणेवर विश्वास टाकल्याने समाधान व्यक्त होत आहे. यामुळे सरकारी डॉक्टर, कर्मचाऱ्यांचेही मनोबल उंचावले आहे. इतरांनीही सरकारी दवाखान्यातच तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया कराव्यात, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी केले आहे.
'पीए'च्या खांद्याची गाठही काढलीआमदारांनी पायाचे कुरूप काढल्यानंतर त्यांचे स्वीय सहायक येलापुरे यांनीही डाव्या खांद्यावर गाठ असल्याचे डॉक्टरांना दाखविले. त्यांच्याही तपासण्या करून लगेच या गाठीची शस्त्रक्रिया करण्यात आली. दोघांनाही भूल उतरताच औषधोपचार करून घरी पाठविण्यात आले.
यांनी केली शस्त्रक्रियाजिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी शस्त्रक्रिया केली. यावेळी गेवराईचे प्र. वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेश शिंदे, डाॅ.गोपाल रांदड, डॉ.ऋषिकेश जायभाय, डॉ.प्रवीण सराफ, संगिता जोगदंड, स्वाती बारगजे, विद्या आहेरवाडकर, भारत गाजरे आदींची उपस्थिती होती.